पुणे : परदेशी पाहुण्यांसाठी `वेट अँड वॉच`! पक्ष्यांचे आगमन दीड महिना लांबणार | पुढारी

पुणे : परदेशी पाहुण्यांसाठी `वेट अँड वॉच`! पक्ष्यांचे आगमन दीड महिना लांबणार

सुनील जगताप

पुणे : थंडीची चाहूल लागली की ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या कालावधीत परदेशी पक्ष्यांचे आगमन पुण्यात होऊ लागते. परंतु, यंदा पक्षिप्रेमींना या परदेशी पाहुण्यांची एक ते दीड महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. पक्ष्यांचे आगमन लांबणीवर पडल्याचे पक्षिअभ्यासकांचे म्हणणे आहे. उजनी जलाशयामध्ये थंडीच्या हंगामात सायबेरिया येथून फ्लेमिंगो हा पक्षी येतो. या पक्ष्याला महाराष्ट्रात रोहित पक्षी तसेच अग्निपंख म्हणून ओळखले जाते. चित्रबलाक, लांब मानेचा करकोचा तसेच ग्रे हेरोन आदी जातींचे पक्षी मोठ्या प्रमाणात येत असतात. पक्ष्यांचे माहेरघर म्हणून भिगवणजवळील कुंभारगाव ओळखले जाते. कुंभारगाव येथे बोटीमध्ये बसून पक्षी पाहण्याचा आनंद मिळत असल्याने अनेक पक्षिप्रेमींच्या नजरा धरणाकडे लागल्या आहेत.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे या वर्षी परदेशी पक्ष्यांचे आगमन उशिरा होणार असून, डिसेंबरमध्ये पूर्ण पक्ष्यांचा थवा दिसून येईल, अशी शक्यता पक्षितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, काही प्रमाणात डिकसळ पूल, भिगवण, तक्रारवाडी या ठिकाणी सध्या रोहित ऊर्फ फ्लेमिंगोचे वास्तव्य आढळत असून, रोहित पक्ष्याबरोबर सिगल, राखी बगळा, करकोचा, काळा शराटी, पेंटेड स्टॉर्क, पाणकोंबड्या, तूतवार तापस आदी जातींचे पक्षी येत असतात. राज्यातील पर्यटकांसाठी पक्षी पाहण्याची ही अनोखी संधी उपलब्ध होणार आहे.

या टप्प्यात दाखल होतात पाहुणे…
पहिल्या टप्प्यात तुतुवार, नदी सुरय, समुद्र पक्षी (गल पक्षी), मत्स्यगरुड, विविध धोबी पक्षी आणि नाना तन्हेच्या बदकांचा समावेश असतो. डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत नकेर, शेंद्रा बड़ा, काणूक, चक्रवाक, पट्टकदंवसरग्या बटवा, ससाणे, मत्स्यगरुड, शिखरा, भोवत्या, मधुबाज हे पक्षी दुसर्‍या टप्प्यात दाखल होतात. तर, डिसेंबर व जानेवारी महिन्यात रोहित (फ्लेमिंगो), पट्टकदंब, कलहंस, चक्रवाक, चिखल बाड्डा, श्वेतबलाक, क्रौंच, फॅलोरोप हे पक्षी जिल्ह्यातील अनेक जलस्थानांसह उजनीच्या विस्तृत पाणलोट क्षेत्रात येऊन दाखल होतात.

 

Back to top button