गाव आमुचा, पण ताबा बिबट्याचा! जुन्नरच्या गावागावांत होतेय बिबट्याचे सुलभ दर्शन

गाव आमुचा, पण ताबा बिबट्याचा! जुन्नरच्या गावागावांत होतेय बिबट्याचे सुलभ दर्शन

बापू रसाळे

ओतूर : जुन्नर तालुक्यातील गावागावातं, वाड्यावस्त्यांवर, उसाच्या शेतात, केळीच्या बनात, झाडावर, खुलेआम अगदी गल्लीबोळातही तसेच मंदिरात, सोसायटीत, बंगल्याच्या आवारात, घरादारात, गोठ्यात, खुराड्यात दिवसा अथवा रात्री कधीही, केव्हाही, कुठेही बिबट्याचे सुलभ दर्शन होऊ लागल्याचे चित्र म्हणजेच बिबट्यांच्या संख्येत झालेली वाढ हेच स्पष्ट होत आहे.

बिबट्या दर्शनानंतर आपापसातील चर्चेला गावागावात उधाण येत असून बिबट्यांच्या करामतीचे व्हिडीओ, फोटो बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची शर्यतदेखील सुरू आहे. इतकेच नव्हे तर रात्रीच्या सुमारास बिबट्याच्या दर्शनासाठी चारचाकी गाडीतून स्थानिक युवक, नागरिक आवर्जून फेरफटका मारू लागले आहेत. बिबट्यांच्या लीला मोबाईलच्या कॅमेर्‍यात टिपून सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा आनंद लुटला जाऊ लागला आहे.

महामार्गावर बिबट्यांचे होणारे अपघात, विहिरीत पडून होणारे बिबट्यांचे दुर्दैवी मृत्यू, दोन बिबट्यांच्या झुंजीत झालेल्या एका बिबट्याचा मृत्यू, आपल्या 2/3 बछड्यांसह खुलेआम वावरणारी बिबट मादी, उसाच्या शेतात हजारदा सापडलेले बिबट्याचे बछडे, पाळीव प्राण्यांवरील हल्ले अशा तालुक्यात नित्य घडणार्‍या अनेक घटना अवलोकन करता बिबट्यांची संख्या अधिकची वाढल्याची साक्ष देत आहे. याबाबतच्या वृत्तपत्रांमधून येणार्‍या गावोगावच्या बातम्यांनी वर्तमानपत्राची पानेच्या पाने व्यापली असल्याचे आपल्याला दररोजची दैनिके उघडताच दिसून येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेताना बैठकीत बिबट सफारी प्रकल्प आंबेगव्हाण येथेच होणार असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. मात्र या प्रकल्प कामाबाबत पुढे कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने बिबट सफारी होणार पण केव्हा, या प्रश्नाने स्थानिक बेरोजगार तरुणांना ग्रासले आहे. बिबट व मानव हे दोन्हीही सुरक्षित होण्याकामी आंबेगव्हाण येथे बिबट सफारी प्रकल्प कामाला तत्काळ प्रारंभ करण्याची जोरदार मागणी होऊ लागली आहे.

बिबट-मानव संघर्षाची धार झाली बोथट…
हल्ली बिबट्यांचा मानवी वस्तीवरील अधिकचा वावर बिबट्यांचा आक्रमकपणा कमी करण्यास कारणीभूत ठरू लागला असून, स्थानिक नागरिक, शेतकरी यांनाही आता बिबट्यांची जणू सवय झाली आहे. एखादी दुसरी अप्रिय घटना वगळता बहुतांश वेळा बिबट व मानव दर्शन होताच बिबटे आपल्या रस्त्याने शांतपणे निघून जात असल्याच्याही बातम्या कानावर येत आहेत.

बिबट या प्राण्याला नित्य मानवाचे दर्शन सुलभ झाल्यामुळे बिबटे माणसाळले तर नाही ना, असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून हल्ली बिबट्या गल्लीत फेरफटका मारून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. शेळ्या, मेंढ्या, पाळीव व भटकी कुत्री यांच्यावरील हल्ल्याव्यतिरिक्त बिबट मानव संघर्षाची धार बोथट झाल्यासारखे वाटत आहे.

logo
Pudhari News
pudhari.news