पुणे : परताव्याचे आमिष पडले 80 लाखांना | पुढारी

पुणे : परताव्याचे आमिष पडले 80 लाखांना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नेक्स्ट एरा कंपनीला विविध कंपन्यांची विविध कामे मिळाल्याचे सांगून त्याबाबतचा करार दाखवून भागीदारीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 80 लाख 50 हजार रुपये घेऊन ते परत न करता फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नेक्स्ट एरा या कंपनीच्या ग्यानचंद सुखाराम (रा. एनआयटी, फरिदाबाद, हरियाणा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शोयब अब्दुल सय्यद (57, रा. ग्राफिकॉन, पॅराडाइज, हौसिंग सोसायटी, एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

संशयित आरोपी ग्यानचंद सुखाराम याची नेक्स एरा ही कंपनी आहे. त्याने फिर्यादी सय्यद यांना विविध कंपन्यांची वेगवेगळी कामे मिळाल्याचे सांगून व अ‍ॅग्रिमेंट दाखवून सय्यद यांना भागीदारी व चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी 80 लाख 50 हजार स्वीकारले. परंतु, फिर्यादी यांना अद्याप कोणताही परतावा न देता व मूळ रक्कम न देता रकमेचा अपहार करून फसवणूक केली.
त्यांनी हरियाणा येथे जाऊन कंपनीबाबत नंतर माहिती घेतली. त्यानंतर आपली फसवणूक झाली म्हणून पोलिस ठाण्यात अर्ज दिला. आता या अर्जाची चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार किसन भारमळ करीत आहेत.

पैसे दामदुप्पट करण्याच्या बहाण्याने फसवणूक
गुंतविलेले पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने चार जणांनी एका तरुणाची व त्याच्या नातेवाइकांचे मिळून 25 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वेळी आरोपींनी काम नाही झाले, तर तुमची मुद्दल तुम्हाला एका महिन्यात परत देतो म्हणून 10 आणि 15 लाख असे धनादेश दिले. हे धनादेश बँकेत टाकले असता पैसे नसल्याने ते बाउन्स झाले.

आरोपींना वेळोवेळी पैसे मागून त्यांनी न दिल्याने आज देतो, उद्या देतो म्हणत फसवणूक केली. याबाबत गोविंद बाबूलाल प्रजापती (30, रा. चांदनी चैक, बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कुमरे करीत आहेत.

 

Back to top button