पुणे : लसीकरणाच्या कमतरतेमुळे गोवरचा उद्रेक | पुढारी

पुणे : लसीकरणाच्या कमतरतेमुळे गोवरचा उद्रेक

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लसीकरणाबाबत असलेले गैरसमज, जनजागृतीचा अभाव हे गोवरच्या उद्रेकामागील मुख्य कारण असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. मुंबईमध्ये झालेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे आणि गोवरचे रुग्ण शोधणे, यावर सध्या भर दिला जात आहे. लसीकरणाच्या माध्यमातून गोवर टाळता येऊ शकतो, याकडे वैद्यकतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. किती मुले लसीकरणापासून वंचित राहिली आहेत, याची यादी करून त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे.

कोरोनाकाळात लहान मुलांच्या नियमित लसीकरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. दोन वर्षे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढत होती. कोरोनाच्या भीतीने पालकांनी मुलांना लसीकरणासाठी घेऊन जाणे टाळले. या पार्श्वभूमीवर गोवरसारखे विषाणुजन्य आजार डोके वर काढू लागले आहेत.

गोवर कशामुळे होतो?
गोवर हा आजार पॅरामिक्सो व्हायरस कुटुंबातील विषाणूमुळे होतो. विषाणू प्रथम श्वसनमार्गावर हल्ला करतो आणि नंतर खोकला किंवा सर्दी किंवा थेट स्पर्शाने निरोगी लोकांना संक्रमित करतो. गोवरचा उद्रेक दर 2 ते 3 वर्षांनी दिसून येतो. कोरोना काळात लसीकरणावर परिणाम झाल्याने गोवरचा उद्रेक दिसून येत आहे.

उच्च ताप आणि अंगावर पुरळ उठणे
खोकला
वाहती सर्दी
लालसर डोळे
अशक्तपणा
भूक न लागणे
गोवर झाल्यानंतर काय करावे?

आजार अंगावर काढून दुर्लक्ष करू नये
डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे सुरू करावीत
गोवर झालेल्या मुलांना इतर मुलांपासून दूर ठेवावे
मुलांचे शरीर ओल्या कापडाने पुसून स्वच्छ करावे

गोवर हा लसीकरणाच्या माध्यमातून टाळता येण्यासारखा आजार आहे. गोवरच्या लसीचा पहिला डोस नऊ ते बारा महिन्यांमध्ये आणि दुसरा डोस 16 ते 24 महिन्यांदरम्यान लहान मुलांना दिला जातो. लसीबाबत असणारे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, गेल्या 15 दिवसांमध्ये 6000 हून अधिक मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. गोवर हा वेगाने पसरणारा आजार असल्याने मुंबईतील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये त्याचा प्रसार दिसून येत आहे.
                                                                       – डॉ. प्रदीप आवटे,
                                                   साथरोग सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य

Back to top button