

सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तुलनेत शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे भाजपचे दुर्लक्ष असल्याची चर्चा मतदारसंघात असतानाच रेणुकासिंग यांच्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल हे तीन दिवसांच्या शिरूर लोकसभेच्या दौर्यावर येणार आहेत. यामुळेच बारामतीप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघ देखील भाजपसाठी टार्गेट असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्या दौर्यानंतर सातत्याने राज्य, केंद्रातील मंत्री बारामती लोकसभा मतदारसंघात दौरे करून मतदारसंघ भाजपने चर्चेत ठेवला आहे.
परंतु, त्या तुलनेत शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले जात आहे की काय? अशी भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. भाजपचे खासदार नसलेले देशातील सर्व मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत भाजपचा एकेकाळचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला आल्याने भाजपने फारसे लक्ष दिले नाही. परंतु, आता भाजपने बारामतीसोबतच शिरूर लोकसभा मतदारसंघ देखील टार्गेट केला आहे.
सप्टेंबर महिन्यात केंद्रीय राज्यमंत्री रेणुकासिंग तीन दिवसांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौर्यावर आल्या होत्या. या तीन दिवसांच्या दौर्यात मतदारसंघातील डॉक्टर, वकील, व्यावसायिक यांसारख्या विविध घटकांना भेटून, नवमतदार टार्गेट करून पक्षाची ध्येयधोरणे सांगणे, केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहचल्यात किंवा नाही, याचा आढावा घेतला.
मतदारसंघातील विविध प्रश्न, समस्यांचा देखील आढावा घेतला. आता केंद्रीय जलजीवन मिशन व अन्न प्रक्रिया राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल 22, 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौर्यावर येत आहेत. यादरम्यान मतदारसंघातील जलजीवन मिशनसह केंद्र शासनाच्या सर्वच योजानांचा गावोगाव जाऊन आढावा घेणार आहेत. पटेल यांच्या दौर्यामुळे भाजपने शिरूर मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले नसून, अत्यंत नियोजनपूर्वक मतदारसंघाची बांधणी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल तीन दिवसांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौर्यावर येणार आहेत. पटेल यांच्या दौर्यामुळे जलजीवन मिशन व केंद्राच्या अन्य योजनांना नक्कीच गती मिळण्यास मदत होईल. तसेच रेणुकासिंग यांच्या दौर्यानंतर पटेल यांचा दौरा होत असल्याने नक्कीच मतदारसंघात भाजपची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
– शरद बुट्टे पाटील
जिल्हा परिषद सदस्य व खेड भाजप नेते