पुणे : ‘चिरीमिरी’साठी ओळखपत्रांचा वापर! महापालिकेतील सेवा निवृत्त व मुदत संपलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांचा प्रताप | पुढारी

पुणे : ‘चिरीमिरी’साठी ओळखपत्रांचा वापर! महापालिकेतील सेवा निवृत्त व मुदत संपलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांचा प्रताप

हिरा सरवदे

पुणे : महापालिकेच्या सेवानिवृत्त आणि मुदत संपलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांकडून महापालिकेचे ओळखपत्र (आय कार्ड) प्रशासनाकडे जमा केले जात नाही. काही जणांकडून याच ओळखपत्राचा वापर चिरीमिरी गोळा करण्यासोबतच इतरांना धमकावण्यासाठी केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिकेचे नाव व लोगो असलेली गळ्यातील लेस शहानिशा न करताच दिली जात असल्याचे हे प्रकरण वरचेवर वाढत असून, ही लेस कोण देते किंवा कोण अनधिकृतपणे विक्री करते, याबाबत सामान्य प्रशासन आणि भांडार विभागाला थांगपत्ताच नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये जवळपास 18 हजार कर्मचारी आणि अधिकारी काम करतात.

यामध्ये साधारण आठ हजार कंत्राटी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या कर्मचार्‍यांना, आधिकार्‍यांना महापालिका प्रशासनाकडून महापालिकेचे नाव व लोगो असलेल्या निळ्या, लाल आणि हिरव्या रंगाची लेस असलेले ओळखपत्र दिले जाते. कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी अशी लेसच्या रंगाची वर्गवारी केलेली आहे. आता पांढर्‍या रंगाच्याही लेस दिल्या जात आहेत. कायमस्वरूपी कर्मचार्‍यांना स्मार्ट कार्ड, तर ठराविक कालावधीसाठी कामाला घेतलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांना हस्ताक्षरातील साधे ओळखपत्र दिले जाते. मात्र, ओळखपत्रांची लेस एक सारखीच म्हणजे निळ्या रंगाची दिली जाते.

खरेतर ओळखपत्राची लेस सामान्य प्रशासन किंवा भांडार विभागाकडून अथवा त्या-त्या विभागप्रमुखांमार्फत दिली जाणे गरजेचे आहे. त्यामुळे खर्‍या आणि कामावर रुजू असलेल्याच कर्मचार्‍याला ती लेस मिळेल, मात्र तसे होत नाही. महापालिकेचे नाव व लोगो असलेली निळ्या रंगाची लेस अधिकार्‍यांना कल्पना न देता बाहेरून छापून घेऊन महापालिकेतीलच एक कर्मचारी खुलेआम चढ्या दराने विक्री करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. संबंधित व्यक्ती महापालिकेचा कर्मचारी आहे की नाही, याची खातरजमा न करताच 80 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत ही लेस विकली जाते. त्यामुळे कर्मचारी नसलेले लोकही वेगळेच आयकार्ड खिशात ठेवून त्याला पालिकेची लेस लावून ती लेस गळ्यात लटकवून मिरवत असतात.

ओळखपत्र जमा करून घेतले जात नाहीत
कोविड काळामध्ये महापालिकेने विविध कामांसाठी कंत्राटी कर्मचारी कामावर घेतले होते. तसेच खासगी वाहनेही कामासाठी घेतली होती. त्या वेळी सर्वांना महापालिकेचे ओळखपत्र दिले होते. मात्र, कामाचा कालावधी संपल्यानंतर महापालिकेने ओळखपत्र जमा करून घेतले नाही. त्यामुळे अनेक वाहनचालक महापालिकेच्या ओळखपत्राचा वापर विविध टोलनाक्यांवर करत असल्याचे दिसून येते. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठीही याचा वापर करीत आहेत, असे निदर्शनास आले आहे.

अधिकार्‍यांचे एकमेकांकडे बोट
महापालिकेच्या एका विभागातील कर्मचारी खुलेआम खातरजमा न करता ओळखपत्राची लेस विक्री करतो. मात्र, याबाबत भांडार विभाग किंवा सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांना काहीही थांगपत्ता नाही. हे दोन्ही विभाग विद्युत विभागाकडे बोट दाखवतात. विद्युत विभागाचे अधिकारीही याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगतात. त्यामुळे महापालिकेचे नाव व लोगो असलेली लेस कोण व कुठे छापते, असा प्रश्न निर्माण होत आहे.

धमकावलेही जाते…
महापालिकेतून निवृत्त झालेल्या किंवा मुदत संपलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांकडून त्यांचे ओळखपत्र महापालिकेत जमा करून घेतले जात नाही. त्यामुळे हे कर्मचारी कामावर नसतानाही रस्त्यावर व्यवसाय करणार्‍यांकडून ओळखपत्र दाखवून चिरीमिरी गोळा करतात, तसेच विविध ठिकाणी धमकावून आपला हेतू साध्य करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Back to top button