दापोडी, सांगवीत पदपथाला अतिक्रमणाचा विळखा | पुढारी

दापोडी, सांगवीत पदपथाला अतिक्रमणाचा विळखा

दापोडी : दापोडी येथील प्रमुख रस्त्याच्या पदपथावर खासगी व्यावसायिक व उद्योजकांनी राडाराडा टाकून अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण असलेल्या ठिकाणी पादचारी मार्गाची पुरती दुरवस्था झाली असून पदपथ असून अडचण नसून खोळंबा याप्रमाणे स्थिती बनली आहे. या पदपथावर खासगी व्यावसायिकांची मक्तेदारी वाढत आहे. या पदपथांचा वापर पादचार्‍यांसाठी न होता व्यावसायिकांसाठी होत आहे. याकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

जुनी सांगवी, नवी सांगवी, दापोडी, कासारवाडी परिसरात अनेक ठिकाणी प्रमुख रस्त्यांवर पादचार्‍यांना सहजगत्या ये-जा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून पदपथांची निर्मिती केली. परंतु या पदपथांवर पादचार्‍यांचा हक्क राहता रस्त्याच्या पदपथावर खासगी व्यावसायिक व उद्योजकांनी जणू आपला सातबाराच कोरला आहे. काही पदपथाचा वापर वाहनतळ, राडारोडा, बांधकामाचे साहित्य, दुकानाचे फलक व साहित्य ठेवण्यासाठी उपयोग होत आहे.

या पदपथावर नागरिकांना चालता येत नाही. याचे कारण दुकानदार सकाळीच आपल्या दुकानातील साहित्य पदपथावर आणून ठेवतात. यामुळे पादचार्‍यांनी चालायचे कोठून, हा गंभीर प्रश्न शहर परिसरात निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालल्याशिवाय पर्याय राहत नाही.

येथील दापोडीतील शितळादेवी चौक ते पिंपळे गुरव नावेचा पूल या रस्त्याचे पदपथ व्यावसायिकांनी बळकविल्याने पादचार्‍यांना वर्दळीच्या मार्गावरून धोकादायकरित्या प्रवास करावा लागतो. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी कारवाईसाठी आल्यानंतर लोकप्रतिनिधींची नावे सांगून हॉटेलचालक, व्यावसायिक, दुकानदार आणि फेरीवाले कारवाईस विरोध करतात ही स्थिती परिसरात दिसून येत आहे.

पदपथावर चालणेही होते कठीण

सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. अनेक वेळा संपूर्ण रस्ता वाहनांच्या गर्दीने भरला जातो. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हक्काच्या पदपथावरून नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे पादचार्‍यांनी चालायचे कोठून हा गंभीर प्रश्न पडतो. हे पदपथ कुणासाठी बनवण्यात आले, असा प्रश्न पडतो. व्यापारी मात्र ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऐटीत आपल्या दुकानातील माल रस्त्यावर लावतात.

Back to top button