

नंदकुमार सातुर्डेकर :
पिंपरी : पिंपरी शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र 25 लाख लोकसंख्येच्या मानाने शहरात बँका, वित्तसंस्था व एटीएम सेंटरचे प्रमाण नगण्य आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चिंचवड स्टेशन अशा ठराविक भागातच बँकिंग सुविधांचे केंद्रीकरण झाले आहे. त्यामुळे शहराच्या इतर भागातील बँक ग्राहकांची गैरसोय होत आहे. पिंपरी- चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे; मात्र त्यामानाने शहरात बँकांचा विस्तार अतिशय कमी प्रमाणात झाला आहे. व्यापारी वर्गात लोकप्रिय असलेल्या सेवा विकास बँकेचा परवाना रिझर्व बँकेने रद्द केला आहे. जुनी अशी व शहरात पिंपरी गाव ,भोसरी आदी भागात शाखा असलेली रुपी बँक निर्बंध वाढवत नेत अवसायानात काढण्यात आली. त्या आधी कराड बँक, सद्गुरू जंगली महाराज बँकही इतिहासात जमा झाल्या.
पुणे- मुंबई महामार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक , बडोदा बँक, एचडीएफसी, आयडीएफसी, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक अशा सर्व बँकांचे व बँक सुविधांचे केंद्रीकरण झाले आहे.
एटीएम सेंटरची संख्या पूर्वी अतिशय मर्यादित होती; मात्र आता छोट्या बँका व को-ऑपरेटिव्ह बँकांनीही आपली एटीएम सेंटर सुरू केली आहेत; मात्र ही एटीएम सेंटर हीच शहराच्या मध्यवर्ती भागातच आहेत. मात्र आता ग्राहक व सर्वसामान्य माणूस छोट्या-छोट्या व्यवहारांसाठी ही ऑनलाइन व्यवहारांना पसंती देत असल्याने एटीएम सेंटरची गरज तशी कमी होत चालली आहे.
नोटबंदी काळात पिंपरी- चिंचवड शहरात बँकांचा फारसा न झालेला विस्तार बँकांमधील अपुरा कर्मचारी वर्ग, आधुनिकतेचा अभाव याचा बँक ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. त्यात रिझर्व बँकेचे पैसे काढण्याबाबत रोज नवीन आदेश निघत असल्याने या त्रासात भर पडली होती.
शहरातील अनेक बँका आपल्या ग्राहकांना प्रिंटेड पासबुक ऐवजी बँकेचे अॅप्स घेऊन आपले व्यवहार स्वतःच पाहण्याचा आग्रह धरत आहेत. पेपरलेसच्या नावाखाली चाललेल्या बँक कर्मचार्यांच्या या कामचुकारपणामुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे . मोबाईलचा वापर तितकासा न जमणारे तसेच ज्येष्ठ नागरिक यांची त्यामुळत् गैरसोय होत आहे. आयकर खात्याचे विवरणपत्र भरताना बँकेचे स्टेटमेंट गरजेचे असते; मात्र बँक पासबुक ऐवजी बँकेच्या अॅप्सवर व्यवहार पाहण्यासाठी ग्राहकांना सांगितले जात असल्याने मग बँक कर्मचार्यांना नेमके काय काम उरणार आहे, असा प्रश्न बँक ग्राहक करत आहेत.