बारामती : अथक परिश्रमांनी डॉक्टरांनी शिवला त्याचा जबडा; मुलावर भटक्या कुत्र्यांच्या हल्ला | पुढारी

बारामती : अथक परिश्रमांनी डॉक्टरांनी शिवला त्याचा जबडा; मुलावर भटक्या कुत्र्यांच्या हल्ला

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील कोर्‍हाळे बुद्रुक परिसरात ऊसतोडणीसाठी आलेल्या तोडणी कामगाराच्या मुलावर हल्ला करीत त्याच्या तोंडाला भटक्या कुत्रांनी जोरदार चावा घेतला. यात त्याचा पूर्ण जबडा व ओठ फाटले गेले. येथील श्रीपाल हॉस्पिटलच्या डॉ. राजेंद्र मुथा व डॉ. सौरभ मुथा या पिता-पुत्रांनी प्रयत्नांची शिकस्त करीत या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.

पाथर्डी तालुक्यातील ऊसतोडणी कामगार सध्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे कामाला आले आहेत. कोर्‍हाळे बुद्रुकनजीक एका ठिकाणी सध्या ते राहत होते. सोमवारी (दि. 14) सायंकाळच्या सुमारास ऊसतोडणी कामगाराचा तीनवर्षीय मुलगा युवराज राठोड हा कोपीसमोर खेळत असताना भटक्या कुर्त्यांनी त्याच्यावर जोरदार हल्ला चढविला. या घटनेत युवराज या बालकाचा पूर्ण जबडा, ओठ कुर्त्यांनी फाडून काढले, मोठा रक्तस्राव झाला. अतिशय भीषण स्थितीत पालकांनी त्याला बारामतीच्या श्रीपाल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आणले.

डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा आणि डॉ. आशुतोष आटोळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ उपचाराला सुरुवात केली. युवराज राठोड याच्या वडिलांकडे तर उपचारांसाठी दमडीही नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपत वैद्यकीय सेवेचे व—त जपत स्वःखर्चातून लागलीच औषधे व अन्य सामग्री आणली. तसेच तत्काळ शस्त्रक्रियेचा निर्णयही घेतला. या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येणार होता. युवराजचे पालक तर ऊसतोडणी कामगार. त्यांच्याकडे पैशाची अडचण.

परंतु, मुलाचा जीव वाचला पाहिजे, भविष्याच्या दृष्टीने त्याच्यावर लागलीच शस्त्रक्रिया झाली पाहिजे, हे लक्षात घेत डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ती तयारी केली. सोमवारी रात्री उशिरा भूल देत युवराजवर शस्त्रक्रिया करीत त्याच्या ओठ व जबड्याला टाके घालण्यात आले. रात्री बारा वाजता ही शस्त्रक्रिया संपविण्यात आली.

तोडणी कामगारांच्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज
दुसर्‍या एका घटनेत इंदापूर तालुक्यातील कौठळी येथे ऊसतोडणीचे काम करणार्‍या एका तोडणी कामगाराचा मुलगा रात्रीच्या वेळी फडातच निपचित पडला. त्याच्या हातापायाची कोणतीही हालचाल होईना. त्यांनी स्थानिक दवाखान्यात धाव घेतल्यावर तेथून बारामतीला न्या, असा सल्ला देण्यात आला. त्याच्या पालकांनी त्याला श्रीपाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याला विषबाधा झाल्याचे दिसून आले. ही विषबाधा शेतात फेकून दिलेल्या कीटकनाशक बाटलीद्वारे झाली असावी, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तविली. व्हेंटिलेटरवर ठेवत या बालकावर आवश्यक ते उपचार डॉ. मुथा पिता-पुत्रांनी करीत त्यालाही जीवदान दिले.

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त गरजेचा
सध्या सर्वत्र भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यातून अशा घटना घडत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त गरजेचा बनला असून, संबंधित यंत्रणांनी यात लक्ष घातले पाहिजे, असे बारामतीचे बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा यांनी सांगितले.

Back to top button