पुणे : गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदी झेंडे; 7 पोलिस उपायुक्तांची नेमणूक | पुढारी

पुणे : गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदी झेंडे; 7 पोलिस उपायुक्तांची नेमणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदी अमोल झेंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयात नव्याने बदलून आलेल्या 7 पोलिस उपायुक्तांची नेमणूक पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केली. तर दोघा पोलिस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. संदीप सिंह गिल्ल यांची परिमंडळ 1 च्या पोलिस उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली. स्मार्तना पाटील यांची परिमंडळ 2, तर सुहेल शर्मा यांची परिमंडळ 3 च्या उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. शशिकांत बोराटे यांची परिमंडळ 4 च्या उपायुक्तपदी, तर विक्रांत देशमुख यांची परिमंडळ 5 च्या उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.

तसेच विजय मगर यांची वाहतूक शाखेच्या उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची आर्थिक व सायबर शाखेच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली. तर परिमंडळ 4 चे उपायुक्त रोहिदास पवार यांची मुख्यालयात पोलिस उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 15) सायंकाळी याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त गुप्ता यांनी काढले.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत थेट उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने थेट पदस्थापना न देता पोलिस आयुक्तालय पुणे शहर अशा सर्व अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामुळे कोणत्या अधिकार्‍याला कोठे नियुक्ती मिळते याची उत्सुकता होती.

Back to top button