पुणे : ऊस गाळपमध्ये बारामती अ‍ॅग्रो अव्वल | पुढारी

पुणे : ऊस गाळपमध्ये बारामती अ‍ॅग्रो अव्वल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांकडून सोमवारअखेर (दि.14) 18 लाख 37 हजार 931 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. तर 8.17 टक्के सरासरी उतार्‍यानुसार जिल्ह्यात 15 लाख 1 हजार 660 क्विंटलइतके साखरेचे उत्पादन हाती आले असल्याची माहिती पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी दिली.

ऊस गाळप आणि साखर उत्पादनात बारामती अ‍ॅग्रो तर साखर उतार्‍यात श्री विघ्नहर कारखान्याने हंगामाच्या सुरुवातीसच आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत 9 सहकारी आणि 6 खासगी मिळून 15 साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू झाले आहे. बारामती अ‍ॅग्रो या खासगी कारखान्याने ऊस गाळप आणि साखर उत्पादनात हंगामाच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. या कारखान्याने सर्वाधिक म्हणजे 3 लाख 24 हजार 630 टनाइतके गाळप पूर्ण केले आहे. 6.97 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 2 लाख 26 हजार 300 क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे.

त्या खालोखाल दौंड शुगर या खासगी कारखान्याने 1 लाख 80 हजार 970 टनाइतके ऊस गाळप पूर्ण केले आहे. या कारखान्याचा उतारा 8.84 टक्के असून 1 लाख 60 हजार 50 क्विंटल साखर उत्पादन तयार करीत दुसरे स्थान मिळविले आहे. दि माळेगाव सहकारीने 1 लाख 57 हजार 340 टन ऊस गाळप आणि 8.29 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 1 लाख 30 हजार 400 क्विंटलइतके साखरेचे उत्पादन तयार केले आहे.

श्री विघ्नहर सहकारीने आत्तापर्यंत 1 लाख 33 हजार 90 टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तर 9.93 टक्के उतार्‍यानुसार 1 लाख 32 हजार 200 क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. विघ्नहरचा साखर उतारा सर्वाधिक आहे. त्या खालोखाल श्री सोमेश्वर सहकारीचा साखर उतारा 9.73 टक्क्यांइतका मिळाला आहे.

जिल्ह्यात 155 लाख टन ऊस गाळप अपेक्षित
पुणे जिल्ह्यात गतवर्षाचा ऊस गाळप हंगाम 2021-22 मध्ये 154 लाख 57 हजार 695 टनाइतके ऊस गाळप पूर्ण झाले होते. कारखान्यांनी पुणे जिल्ह्याव्यतिरिक्त सोलापूर, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, सातारा या जिल्ह्यांतून गाळपासाठी ऊस आणला होता. चालू वर्ष 2022-23 मध्ये 30 मे 2022 अखेर साखर कारखान्यांकडे तोडणीसाठी नोंद झालेल्या उसाचा आकडा 157 लाख 50 हजार 932 टनाइतका आहे. उसाची हेक्टरी उत्पादकता 97 टनाइकी राहण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर प्रत्यक्ष संभाव्य ऊस गाळप 155 लाख 25 हजार 304 टनाइतके होण्याची अपेक्षाही डोईफोडे यांनी व्यक्त केली.

 

Back to top button