पुणेकरांना पाहायला मिळणार महिला खेळाडूंचा थरार | पुढारी

पुणेकरांना पाहायला मिळणार महिला खेळाडूंचा थरार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दै. ’पुढारी’ आयोजित ’राईज अप’ महिलांच्या क्रीडा स्पर्धेला फुटबॉल या खेळापासून सुरुवात होत आहे. त्याचबरोबर कबड्डीचा थरारही पुणेकरांना अनुभवता येणार आहे. दै. ’पुढारी’ च्या वतीने या महिलांच्या क्रीडा स्पर्धांचा थरार गुरुवार दि. 17 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. फुटबॉल आणि कबड्डी या दोन्ही क्रीडा स्पर्धांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातून महिला खेळाडूंनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला आहे. फुटबॉल क्रीडा प्रकारापासून दै. ’पुढारी’ च्या खेळाच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्रीय मंडळाच्या मुकुंदनगर येथील मैदानावर सकाळी 10 वाजल्यापासून फुटबॉल क्रीडा प्रकाराला सुरुवात होणार आहे तर शुक्रवार दि. 18 नोव्हेंबरपासून कबड्डी खेळाच्या स्पर्धा रंगणार आहेत. ही कबड्डी स्पर्धा नेहरू स्टेडियम येथील मैदानावर होणार आहे. कबड्डीसाठी अनेक महिला संघांनी सहभाग नोंदविलेला आहे. अद्यापही दोन्ही खेळांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडू आणि संघांकडून विचारणा होत असून नाव नोंदणी सुरू असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

दै. ’पुढारी’च्या फुटबॉल स्पर्धेत लागणार खेळाडूंचा कस

दै. ’पुढारी’ आयोजित ’राईज अप’ महिलांच्या क्रीडा स्पर्धेच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये महिलांच्या खुल्या गटाचा समावेश करण्यात आला असून, आत्तापर्यंत 14 संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. अद्यापही नावनोंदणी सुरू असून, संघांकडून विचारणा होत आहे. पूना डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धा गुरुवार दि. 17 ते रविवार दि. 20 नोव्हेंबर यादरम्यान सकाळी 10 ते 5 या वेळेत होणार आहेत. या स्पर्धा महाराष्ट्रीय मंडळाच्या मुकुंदनगर येथील मैदानावर रंगणार आहेत. या स्पर्धेत मुलींचा वाढलेला सहभाग हेच स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार आहे.

कधी आणि कुठे होणार स्पर्धा..?
फुटबॉल स्पर्धा गुरुवार दि. 17 ते रविवार दि. 20 नोव्हेंबर
ठिकाण : महाराष्ट्रीय मंडळ, मुकुंदनगर.

कबड्डी स्पर्धेला महिला संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दै. ’पुढारी’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ’राईज अप’ पुणे महिला क्रीडा स्पर्धेच्या कबड्डी या प्रकारात आत्तापर्यंत 44 महिला संघांनी आपला सहभाग नोंदविला असून, अद्यापही नावनोंदणी सुरू आहे. स्वारगेट येथील नेहरू स्टेडियम येथे या स्पर्धा शुक्रवार दि. 18 ते रविवार दि. 20 नोव्हेंबर यादरम्यान रंगणार आहेत. या स्पर्धा दोन वयोगटांत होणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने सबज्युनिअर (16 वर्षांखालील) आणि खुल्या गटाचा समावेश आहे. सोळा वर्षांखालील आणि खुल्या गटामध्ये संघ आणि खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. प्रत्येक संघामध्ये 15 खेळाडूंचा समावेश असणार आहे. या स्पर्धा पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होणार आहेत.

कधी आणि कुठे होणार स्पर्धा..?
फुटबॉल स्पर्धा शुक्रवार दि. 18 ते रविवार दि. 20 नोव्हेंबर
ठिकाण : नेहरू स्टेडियम, स्वारगेट

कोणते वयोगट..?
सबज्युनिअर (16 वर्षांखालील) आणि खुला गट…

दैनिक ’पुढारी’च्या वतीने महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात मोठ्या स्पर्धेचे आयोजन केल्याचे ऐकून अतिशय आनंद झाला. आजच्या आधुनिक युगात महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत. आपल्या हिमतीवर महिलांनी देशाचा नावलौकिक सातासमुद्रापार नेला आहे. विविध क्रीडाप्रकारांच्या माध्यमातूनही आज अनेक तरुण महिला खेळाडू देशाचा गौरव वाढवत आहेत. अशातच महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी दैनिक ’पुढारी’ने हा अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शहरी भागासह ग्रामीण भागातील तरुण खेळाडू मुलींना नक्कीच प्रोत्साहन मिळेल, असा मला विश्वास वाटतो. या स्पर्धेसाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा!

                                                               -चंद्रकांतदादा पाटील,
                                             उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा

कोरोनाकाळात लोकांना खूप त्रास झाला. अशा वेळी शारीरिक, मानसिक व आर्थिक तणाव नागरिकांना सोसावा लागला. अशा वेळी विरंगुळा हवा असतो. ’पुढारी’ने ती गरज ओळखून महिलांसाठी तब्बल आठ प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे विशेष आयोजन केले. ही खूप चांगली सुरुवात शहरात झाली आहे. दैनिक ’पुढारी’ने खास महिलांसाठी घेतलेल्या हा उपक्रम खूपच चांगला आहे. त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.

                                                                  – वंदना चव्हाण, खासदार

दैनिक पुढारीच्या वतीने महिला क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जात आहे ही खरच कौतुकाची बाब आहे आज महिलांचे वर्चस्व जवळपास सर्वच क्षेत्रात पाहायला मिळते अगदी देशाच्या राष्ट्रपती ह्या सुद्धा एक महिला आहेत हे विकसीत भारताचे प्रतीक म्हणावे लागेल आजची महिला ही प्रत्येक बाबतीत सक्षम आहे महिला सक्षमीकरण ह्या विषयात काम करत असताना दै.पुढारीच्या ह्या उपक्रमास माझ्या मनापासून शुभेच्छा

                                                      खासदार गिरीश बापट, पुणे लोकसभा

पुढारीने घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून वेगळ्या स्वरूपाचा आहे. महिलांना महिनाभर विविध क्रीडाप्रकार खेळायला मिळणार आहेत. कोरोना काळात लोकांना घराबाहेर बाहेर पडता आले नाही, तसेच शारीरिक व्यायाम देखील कमी झाले होते. पुढारीने घेतलेल्या या उपक्रमामुळे महिलांना नवी ऊर्जा या माध्यमातून मिळणार आहे.या उपक्रम भरभरून शुभेच्छा देतो.
                                                     -विक्रम कुमार,आयुक्त, पुणे महापालिका

Back to top button