लेण्याद्री : सातवाहनकालीन रांजणाचे होणार संवर्धन, पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांनी दिली माहिती | पुढारी

लेण्याद्री : सातवाहनकालीन रांजणाचे होणार संवर्धन, पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांनी दिली माहिती

लेण्याद्री, पुढारी वृत्तसेवा: सातवाहन काळात कल्याण ते पैठण या व्यापारी मार्गावर नाणेघाट (घाटघर, ता. जुन्नर) येथे असलेल्या दगडी रांजणाचा जकातीसाठी वापर केला जात असे. या रांजणाचे संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागाने काम सुरू केले आहे, अशी माहिती पुरातत्व खात्याचे सहायक सर्वेक्षक बाबासाहेब जंगले यांनी दिली.

रांजण असलेल्या ठिकाणी जुन्या धाटणीतील दगडी चौथरा उभारला आहे. हे सुमारे 3 टन वजनाचे प्राचीन रांजण क्रेनच्या साह्याने त्यावर ठेवले आहे. चौथर्‍यावर जाण्यासाठी पायर्‍या केल्या असून, पर्यटक व अभ्यासकांना हे दगडी रांजण व्यवस्थितरीत्या अभ्यासता येणार आहे, असेही जंगले यांनी सांगितले. सातवाहन राणी नागणिकेने या नाणेघाटाची 2200 वर्षांपूर्वी निर्मिती केली होती, असा उल्लेख येथे आढळतो.

देशविदेशातील व्यापारी समुद्रमार्गे आपला माल नालासोपारा येथील बंदरावर घेऊन आल्यानंतर कल्याणहून पुढे बैलगाडीतून तो माल वैशाखखेरे इथपर्यंत घेऊन येत , असत. त्यानंतर तो माल गाढव, खेचर आदी प्राण्यांच्या पाठीवर लादून नागमोडी वाटेवरून घाटावर आणत असे. येथील रांजणात जकात टाकल्यानंतर पुढे जुन्नर व पैठणीच्या दिशेने हा माल जात असे. याबाबतचा उल्लेख येथील प्राकृत भाषेतील शिलालेखात आढळतो. लेणीत प्रवासी, व्यापारी, विश्राम करून पुढे जात असत. या परिसरात खडकात कोरलेल्या विविध पाण्याच्या टाक्या असून, त्या टाक्यांवरही सध्या पुरातत्व विभागाच्या वतीने जाळ्या टाकण्याचे काम पूर्ण झाल्याचे पुरातत्व विभागाच्या गोकूळ दाभाडे यांनी सांगितले. नाणेघाटातील शिलालेखाचे देखील संवर्धन करावे, अशी मागणी होत आहे.

Back to top button