पुणे: आदिवासींच्या आधारसाठी विशेष मोहीम, जिल्ह्यात 63 पथके तैनात; लहान मुलांनाही मिळणार आधार कार्ड | पुढारी

पुणे: आदिवासींच्या आधारसाठी विशेष मोहीम, जिल्ह्यात 63 पथके तैनात; लहान मुलांनाही मिळणार आधार कार्ड

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा: आधार कार्डपासून वंचित असलेले आदिवासी, बालक व इतरांना आधार कार्ड देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने जिल्ह्यात विशेष मोहीम सुरू केली आहे. यासाठी महिला व बालविकास विभागाने 63 पथके तैनात केली आहेत. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपकार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे म्हणाले की, दुर्गम तसेच ग्रामीण भागातील 0 ते 6 वयोगटातील अनेक बालकांना अद्याप आधार कार्ड मिळालेले नाही. तसेच आदिवासी व इतर समाजही आधार कार्डपासून वंचित आहे. त्यांना आधार कार्ड देण्यासाठी महिला व बालविकास विभागाने 63 युनिट तैनात केली आहेत.

आधार कार्ड काढण्यासाठी शासनाने एजन्सी नेमल्या आहेत. सर्वांना मोफत आधार कार्ड देण्यात येणार आहे. आधार कार्ड विशेष मोहिमेत तालुक्याचे बालविकास प्रकल्पाधिकारी, पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका मदतनीस व स्थानिक ग्रामपंचायती सहभागी झाल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात तीन ते सहा युनिट सज्ज केले असून, गावोगाव युनिट जाणार आहेत.

सिंहगडाच्या पायथ्याला डोणजे (ता. हवेली) येथे बुधवारी (दि. 9) आधार कार्ड मोहिमेत बालकांसह परिसरातील आदिवासी कातकरी समाजाचे व इतर नागरिक सहभागी झाले होते. या वेळी बालकांसह 39 जणांची आधार कार्डची नोंदणी करण्यात आली आहे.
याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे म्हणाले की, सिंहगड-पानशेतच्या डोंगरी भागात मोबाईलला रेंज नसल्याने अनेक गावांत आधारलिंक होत नाही. त्यामुळे अंगणवाड्या, प्राथमिक शाळांतील अनेक बालक, विद्यार्थी आधार कार्डपासून वंचित आहे. तसेच, आदिवासी देखील आधार कार्डपासून दूर आहेत. विशेष मोहिमेमुळे गैरसोय दूर होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या माजी सभापती पूजा पारगे, आदिवासी विभागाच्या रेणुका जाधव, सदाशिव केळगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वागत रिंढे, योगेश भगत, तालुका बालविकास प्रकल्पाधिकारी अक्षता शिंदे, सदस्य योगेश भामे आदी या वेळी
उपस्थित होते.

Back to top button