भवानीनगर : गेटकेनची अडवणूक केल्यास कारखान्याचेच नुकसान, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांचे मत | पुढारी

भवानीनगर : गेटकेनची अडवणूक केल्यास कारखान्याचेच नुकसान, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांचे मत

भवानीनगर, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील सर्वच साखर कारखान्यांमध्ये या वर्षी ऊसतोडणी वाहतुकीची यंत्रणा कमी आहे. त्यामुळे छत्रपती कारखान्यातदेखील तोडणी वाहतूक यंत्रणा कमी प्रमाणात आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी गेटकेन घेण्यात येत आहे. परंतु, गेटकेन उसाची अडवणूक केल्यास कारखान्याचे व पर्यायाने सभासदांचेच नुकसान होणार आहे, अशी माहिती श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.

साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना काटे म्हणाले, की गेटकेन ऊस घेण्याच्या बोलीवर बाहेरच्या कार्यक्षेत्रातील ऊस वाहतूकदारांशी करार केले आहेत. मागील वर्षीच्या गाळप हंगामात गेटकेनची वाहने बाहेर काढल्यामुळे कारखान्याला पूर्ण क्षमतेने उसाचा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे कारखान्याचा व सभासदांचाच तोटा झाला. या वर्षी ऊसतोडणी वाहतुकीची यंत्रणा कमी असताना गेटकेनची वाहने पळवून लावली, तर त्यांना कारखान्याने दिलेली उचल वसूल करण्यासाठी अडचण येईल. कारखान्याला गळपासाठी उसाची उपलब्धता कमी होईल. दोन्ही बाजूने कारखान्याचाच तोटा होणार आहे.

आगाऊ मळी व साखरेची विक्री केल्यामुळे 47 कोटी रुपये बिनव्याजी उपलब्ध झाले. हे पैसे उपलब्ध झाले नसते, तर गाळप हंगाम सुरू करता आला नसता. आगाऊ मळी व साखरेची विक्री याआधीदेखील करण्यात आली आहे. शासनाने एफआरपीचे सूत्र ठरवून दिले आहे. त्यामुळे एक रकमी एफआरपीसाठी शासनाबरोबरच भांडले पाहिजे. कारखान्यावर प्रशासक आल्यास माझा त्रास कमी होईल. त्यामुळे प्रशासकांचे स्वागतच करण्यात येईल, असे काटे यांनी सांगितले.

Back to top button