वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच सचिन माळीला फसवणूकप्रकरणी अटक | पुढारी

वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच सचिन माळीला फसवणूकप्रकरणी अटक

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे मित्राची गाडी तब्बल चौदा महिने लांबवून फसवणूक केल्याप्रकरणी शिरूर तालुक्यातील वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर ऊर्फ सचिन माळी याला पोलिसांनी अटक केली आहे. माळी हा शिक्रापूर पोलिसांना तब्बल सहा महिने गुंगारा देत होता.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील बाळासाहेब लांडे यांचा मित्र असलेला वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर ऊर्फ सचिन माळी याने लांडे यांच्या घरी येऊन काही कामानिमित्त लांडे यांची (एम एच 12 एच के 6677) ही स्कोर्पिओ कार नेली होती. त्यांनतर अनेक दिवस उलटूनदेखील सचिन माळी हा स्कोर्पिओ घेऊन आला नाही. त्यानंतर सचिन माळी हा वारंवार उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने बाळासाहेब राजाराम लांडे (वय 41, रा. लांडेवस्ती, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता, शिक्रापूर पोलिसांनी मे 2022 मध्ये गुन्हे दाखल केले होते.

मात्र, गुन्हे दाखल झाल्यापासून माळी हा पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर रविवारी सायंकाळच्या सुमारास माळी हा कोरेगाव भीमा परिसरात येणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, पोलीस शिपाई भास्कर बुधवंत यांनी या ठिकाणी जात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या माळी यास अटक केली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर व पोलीस शिपाई भास्कर बुधवंत हे करीत आहेत.

Back to top button