बारामती : रेशन दुकानदारांकडे खंडणी मागणार्‍यावर गुन्हा | पुढारी

बारामती : रेशन दुकानदारांकडे खंडणी मागणार्‍यावर गुन्हा

बारामती; पुढारी वृत्तसेवा : 15 हजार रुपये न दिल्यास स्वस्त धान्य दुकानातील शिधा वाटपाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे खोट्या तक्रारी करेन, अशी धमकी देत खंडणीची मागणी केल्याप्रकरणी किरण लव्हाजी मदने (रा. ढेकळवाडी, ता. बारामती) यांच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बापूराव गणपत ठोंबरे (रा. खताळपट्टा, ढेकळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या पत्नीच्या नावे स्वस्त धान्य दुकान आहे. फिर्यादी हे ढेकळवाडी विविध कार्?कारी सेवा सहकारी सोसायटीच्या रेशन दुकानात सेल्समन म्हणून काम करतात. दि. 15 जुलै रोजी दुपारी मदने यांनी त्यांना फोन करून 15 हजार रुपयांची मगणी केली. पैसे न दिल्यास शिधा वाटपाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे खोट्या तक्रारी करून त्रास देईन, असे सांगितले.

फिर्यादीने घाबरून एक हजार रुपये देण्याची तयारी दाखवली. परंतु, त्याने फोन बंद केला. मदने यांनी तहसील कार्यालयाकडे ठोंबरे यांच्या रेशन दुकानासंबंधी माहिती अधिकारात माहिती मागितली. 25 सप्टेंबर रोजी दीडच्या सुमारास भवनीनगर येथे फिर्यादीने त्यांची भेट घेत एक हजार रुपये देण्याची तयारी दाखवली. परंतु, 15 हजार रुपये द्यावे लागतील, असे बोलून तो निघून गेला. त्यानंतर फिर्यादी ढेकळवाडी येथे दस्तगीर अब्दुल मुलाणी (रा. पतंगशहानगर, बारामती) यांच्या दुकानावर आले असताना मुलाणी यांच्याकडे मदने यांनी 30 हजार रुपये मागितल्याचे समजले. त्यानंतर फिर्यादीने याप्रकरणी तक्रार देण्याचे ठरवून पोलिसांत फिर्याद दाखल केली.

Back to top button