भोसरी : रस्त्यावर मोकाट जनावरांचा उपद्रव

भोसरी; पुढारी वृत्तसेवा : भोसरी परिसरातील मुख्य रहदारीच्या मार्गावर तसेच परिसरातील अंतर्गत रस्त्यावर दिवसभर ठाण मांडून बसलेली किंवा उभी असलेली मोकाट जनावरे पादचारी आणि वाहनचालक यांच्यासाठी एक डोकेदुखी बनली आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. परिणामी रस्त्यांवरील जनावरांमुळे पादचारीही त्रस्त झाला आहे. महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा परिसरात त्रास वाढला आहे. शहरातील महामार्गावरील आणि वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर तर जणू काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. मोकाट जनावर रस्त्यावर आडवे आल्याने दुचाकी घसरून पडण्याच्या घटना सतत घडत आहेत.
भोसरी परिसरातील मुख्य रस्त्यावर तसेच प्रभागातील अंतर्गत रस्त्यावर जनावरे रस्त्यावर बसत आहेत. जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेले असतात. त्यामुळे अनेकदा अपघात होतात. शहरातील विविध भागांत जनावरांचा कळप नेहमीच रस्त्यांवर उभे किंवा बसलेले असतात. मोकाट प्राण्यांनी चक्क रस्त्यावर आपले ठाण मांडले आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन कधी नागरिक तर कधी स्वतः जनावरेही जखमी होत आहेत. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे वाहनचालक सांगतात.
या समस्येपासून सुटका कधी ?
भोसरी परिसरातील पुणे-नाशिक हायवे, आळंदी रोड, सँडविक कॉलनी, दिघीरोड, लांडेवाडी, पीसीएमटी चौक, भोसरी-आळंदी चौक, राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखालील परिसर, चक्रपाणी वसाहत तसेच परिसरातील अंतर्गत रस्त्यावर मोकाट जनावरे त्रासदायक ठरत आहेत. याचे परिणाम वाहनचालकांना भोगावे लागत आहेत. किरकोळ वाटणार्या, पण या गंभीर समस्येपासून महापालिका प्रशासन सुटका कधी करणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.