देहूरोड : जमीन कोणाच्या मालकीची ते तपासून पहा | पुढारी

देहूरोड : जमीन कोणाच्या मालकीची ते तपासून पहा

देहूरोड; पुढारी वृत्तसेवा : शेलारवाडी ते किन्हई ही जमीन कोणाच्या मालकीची आहे ते तपासून पहा. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष वैष्णव प्रकाश यांनी असे आदेश देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार माने यांना दिले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची सोमवारी, दि.14 रोजी बैठक होती.

बैठकीस वैष्णव प्रकाश, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार माने, नाम निर्देशित सदस्य कैलास पानसरे आदी उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्यांनी दोघांनाही प्रश्न विचारला, दोघांनीही माहिती घेऊन सांगतो, असे उत्तर दिले. या जमिनीचे सर्वेक्षण करा, मिल्ट्रीच्या हद्दीत असेल तर संबंधितांना नोटीस द्या, असे वेगवेगळे आदेश ब्रिगेडियर वैष्णव प्रकाश यांनी दिले.

माने यांनी देहूरोड परिसरात एकूण बारा बेकायदेशीर मोबाईल मनोरे असल्याचे सांगितले. खात्री करून त्यांना नोटिसा पाठविण्यात येत आहेत, असे सांगितले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे रुग्णालयातील आयसीयू तीन वर्षांकरिता ओजस हॉस्पिटल यांना चालवण्यास देण्याचे ठरले. दरमहा त्यांच्या कमाईतील पाच टक्के कमाई बोर्डाला देणार असल्याचे सांगितले.

चिंचोली व झेंडे मळा येथील रस्ता खराब आहे. हा रस्ता नीट करण्यासाठी पीडब्ल्यूडीला पत्र लिहिण्यात येईल. खड्डे मात्र कॅन्टोन्मेंट बोर्ड बुजविणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयात पंतप्रधान योजनेतून गरोदर महिलांसाठी योजना सुरू करण्यात येणार आहे.

शाळेसाठी स्वतंत्र ग्राउंड
महात्मा गांधी शाळेच्या सध्याच्या ग्राउंडवर शाळेसाठी स्वतंत्र ग्राउंड करण्यात येणार आहे. इतर ग्राउंडवर क्रिकेट, फनफेयर व सार्वजनिक कार्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक भाडे घेण्यात येणार आहे.

Back to top button