दहिवडी परिसरात बिबट्याचे दर्शन; वनविभागाच्या कारभारावर ग्रामस्थांची नाराजी | पुढारी

दहिवडी परिसरात बिबट्याचे दर्शन; वनविभागाच्या कारभारावर ग्रामस्थांची नाराजी

तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : दहिवडी (ता. शिरूर) येथे गेल्या वर्षांपासून बिबट्याचा सतत वावर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असल्याच्या तक्रारी वनविभागाकडे केल्या होत्या. बिबट्या दिवसाढवळ्या शेतातून जात असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दहिवडी (ता. शिरूर) येथील गणेश केरभाऊ गारगोटे यांच्या निदर्शनास मोठा बिबट्या पडला.

त्यांनी तत्काळ गावच्या पोलिस पाटील जालिंदर पवार यांना कळवले. दरम्यान नागरिकांच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले असून वनविभागाने या भागात बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

परिसरातील शेतकर्‍यांची पाळीव प्राणी शेळ्या मेंढ्या, वासरे, कुत्री यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. अंकुश ढमढेरे यांच्या शेतात अज्ञात जनावराचा बिबट्याने फडशा पडला होता. या ठिकाणी पिंजरा लावुनही बिबट्याचा वावर आणि हल्ले कमी झाले नाही. याबाबत वनविभागाने लक्ष देण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा नाराजीचा सुर ग्रामस्थांतुन निघत आहे. या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याची कल्पना नागरिकांनी वनविभागाला वेळोवेळी दिली परंतु ठोस उपाययोजना करत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ हतबल झाले आहे.

बिबट्याला लपण्यासाठी बक्कळ जागा असल्याने त्याचे वास्तव या भागात आहे. त्यामुळे सतत बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. वनविभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यवाही केली पाहिजे. बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राणी शिकार होत आहे. असे हल्ले सातत्याने चालु राहिल्यास माणसांवर बिबट्या हल्ले करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहिवडी गावचे पोलिस पाटील जालिंदर पवार यांनी शेतकर्‍यांना शेतात जाताना काठी सोबत ठेवावी, उजेडासाठी बॅटरी, मोबाईलमध्ये गाणी किंवा मोठ्या आवाजात बोलत जावे अश्या प्रकारच्या सुचना देऊन दक्षता घेण्यास सांगितले.

Back to top button