तीन दुर्घटनांत पाच पर्यटक जखमी; सिंहगड, राजगड, तोरणागडावर गर्दी

तीन दुर्घटनांत पाच पर्यटक जखमी; सिंहगड, राजगड, तोरणागडावर गर्दी
Published on
Updated on

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : सिंहगडासह तोरणागड व राजगडवर पर्यटकांनी रविवारी गर्दी केली होती. तोरणागडावर एका तरुणाला सर्पदंश झाला, तर राजगडाच्या बालेकिल्ल्यावर माकडाने उडी मारल्याने बुरुजावर दगड डोक्यात कोसळून एक जण गंभीर जखमी झाला. तसेच, सिंहगडावरून परतताना खडकवासला परिसरातील कोल्हेवाडी फाट्यावर जीपची धडक बसल्याने तीन पर्यटक गंभीर जखमी झाले.

सिंहगड घाट रस्त्यासह खडकवासला धरण चौपाटीवरील पुणे-पानशेत रस्त्यावर सकाळपासून वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. सिंहगडावर दिवसभरात पर्यटकांची 626 चारचाकी व 1753 दुचाकी वाहनांची नोंद झाली. गडाच्या घाट रस्त्याच्या दोन्ही मार्गावर पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

गडावरील वाहनतळ फुल झाल्याने थेट घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. डोणजे गोळेवाडी व अवसरवाडी फाट्यावर काही काळ वाहतूक बंद करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके, रमेश खामकर, नितीन गोळे यांना कसरत करावी लागली.

सिंहगड किल्ल्यावरून दुचाकीवरून घराकडे जाणार्‍या पर्यटकांना कोल्हेवाडी फाट्यावर जीपची धडक बसली. त्यात वैभव चत्तार, किरण माने व शिंगोणो ( पूर्ण नावे समजू शकली नाही), असे तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार प्रवीण ताकणकणे यांनी सांगितले.

राजगडाच्या संजीवनी, सुवेळा, पद्मावती माच्यांसह बालेकिल्ल्याचा परिसर तरुणाईने हाऊसफुल्ल झाला होता. बालेकिल्ल्याच्या बुरुजावर माकडाने उडी मारल्याने तेथील दगड डोक्यात कोसळून एक पर्यटक गंभीर जखमी झाला. डोक्यातील जखम कापडाने बांधून त्याला तातडीने खाली आणण्यात आले.

तोरणागडावर तरुणाला सर्पदंश
तोरणागडावर दिवसभरात तीन ते चार हजारांहून अधिक पर्यटकांनी गर्दी केली होती. कोकण दरवाजाजवळ बुरुजावर हात ठेवून उभ्या असलेल्या प्रशांत कृष्णाजी भोसले (वय 27, रा. विश्रांतवाडी) या युवकाला सर्पदंश झाला. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने वेल्हे येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर तो सावध झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news