वेळेची ना कामाची चिंता… बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय | पुढारी

वेळेची ना कामाची चिंता... बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय

रघुनाथ कसबे

बिबवेवाडी : बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी साइट व्हिजिटचे कारण सांगून कार्यालयात उशिरा येतात. त्यामुळे सकाळी दहाच्या सुमारास या कार्यालयात शुकशुकाट असल्याचे दिसून आले. नागरिक विविध समस्या व इतर कामांसाठी सकाळी लवकर कार्यालयात येतात. मात्र, मुकादम व इतर कर्मचारी प्रभागात गेले असल्याचे उत्तर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दुपारी बारा वाजेपर्यंत ते कार्यालयात येत नसल्याने ड्रेनेज व कचर्‍यांची समस्या कोणाकडे मांडायची, असा प्रश्न या ठिकाणी आलेल्या नागरिकांनी उपस्थित केला.

बिबवेवाडी क्षेत्र कार्यालयांतर्गत दोन महापालिकांचे कार्यालय आहे. गंगाधाम चौक येथे फेडरल बँकेजवळ पथ विभाग, विद्युत विभाग, स्थापत्य, उद्यान इत्यादी सर्व विभागांचे कनिष्ठ अभियंते यांचे कार्यालय आहे. तेथे सकाळी शुकशुकाट असल्याचे दिसून आले. कर्मचार्‍यांना अधिकार्‍यांबाबत विचारणा केली असता साहेब मुख्य कार्यालयात गेल्याचे त्यांनी सांगितले. अधिकारी व कर्मचारी यांचे गमन (हालचाल) रजिस्टर पाहिले असता फक्त दोन कर्मचार्‍यांनी कार्यालयीन कामकाजासाठी बाहेर गेल्याची नोंद केल्याचे आढळून आले. काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत चहा पिण्यासाठी जात असल्याचे दिसून आले.

मी गेल्या दोन दिवसांपूर्वी बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार स्वीकारला आहे. कर्मचार्‍यांची उपस्थिती ’बायोमेट्रिक’ प्रणालीद्वारे नोंदविण्याबाबत आयुक्तांचे पत्र आले आहे. पुढील आठवड्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येईल.
                                                                        – प्रसाद भांगे,
                                               सहायक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय

Back to top button