मांडवगण फराटा : पैसे वाटले नसते, तर अनेकांचे डिपॉझिट जप्त झाले असते : दादा पाटील फराटे | पुढारी

मांडवगण फराटा : पैसे वाटले नसते, तर अनेकांचे डिपॉझिट जप्त झाले असते : दादा पाटील फराटे

मांडवगण फराटा; पुढारी वृत्तसेवा : रावसाहेबदादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीत सत्ताधारी गटाने मतदारांना पैसे वाटले नसते, तर त्यांच्या निम्म्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असते, अशी टीका कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे यांनी केली. घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचा आभार मेळावा मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना दादा पाटील फराटे म्हणाले की, घोडगंगा साखर कारखाना निवडणूक ही सभासदांच्या अस्तित्वाची लढाई होती. या निवडणुकीत मतदारांनी किसान क्रांती पॅनेलवर विश्वास ठेवून मतदान केले होते, त्यामुळे सत्ताधार्‍यांना खडे आव्हान निर्माण झाले. सत्ताधारी गटाला विजयी होऊन देखील त्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत नाही.

सभासदांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे आगामी काळात मी शिरूरकरांचा सालकरी म्हणून काम करेन. एक रुपया न देता केलेले मतदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. सभासदांच्या वारसनोंदीच्या प्रलंबित असलेल्या विषयाबाबत सभासदांनी कारखाना नियमानुसार कागदपत्रे प्रस्ताव सादर करावीत. त्याबाबत पाठपुरावा केला जाईल.

कामगारांच्या थकीत वेतनासाठी प्रयत्न करून वेळेत पगार मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त सभासदांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस घालण्यासाठी व जास्तीत जास्त बाजारभाव मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दादा पाटील फराटे यांनी सांगितले. माजी संचालक सुधीर फराटे इनामदार यांनी सांगितले की, कारखाना निवडणुकीत स्वयंस्फूर्तीने कार्यकर्ते काम करीत होते. याउलट सत्ताधारी गटाला तालुक्यातील, जिल्ह्यातील नेते यांसह एमआयडीसीमधील मोठी फौज उभी करावी लागली.

कार्यसम—ाट म्हणवून घेणार्‍यांना त्यांच्या तीन गटांत आघाडी घेता आली नाही. नैतिकतेचा हा विजय झाल्याचे फराटे यांनी सांगितले. या वेळी बोलताना आबासाहेब गव्हाणे म्हणाले की, घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूक ही इतर निवडणुकीपेक्षा वेगळी होती. राज्यात सहकार संपत चालला आहे. जे कारखान्यावर सत्तेत आहेत, त्यांचे खासगी कारखाने आहेत. आगामी काळात सहकार टिकविणे हे मोठे आव्हान असणार आहे. कारखाना निगडित असणार्‍या सभासदांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यायला हवे.

या वेळी आबासाहेब सोनवणे, काका खळदकर, प्राची दुधाने, निर्मला केसवड, अविनाश पवार, बाळासाहेब घाटगे, शरद गद्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, अरविंद ढमढेरे, संतोष मोरे, राजेंद्र कोरेकर पांडुरंग थोरात, वीरेंद्र शेलार, गोविंदतात्या फराटे, आत्माराम फराटे, वैजयंता चव्हाण, सचिन मचाले, महेश ढमढेरे, पांडुरंग दुर्गे, लक्ष्मण फराटे आदींसह पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

Back to top button