आळंदी : कार्तिकी सोहळ्यात भाविकांच्या वाहनांना पिवळा पास | पुढारी

आळंदी : कार्तिकी सोहळ्यात भाविकांच्या वाहनांना पिवळा पास

श्रीकांत बोरावके

आळंदी : अनेक वर्षे स्थानिक नागरिक असूनदेखील आळंदीत वारी काळात वाहनांसहीत घरी जाता यावे यासाठी प्रवेश मिळावा म्हणून आर्जव विनंती करणार्‍या आणि त्यांच्याच पुढे भाविक म्हणून दिंडी पास दाखवत ट्रकच्या ट्रक आळंदीत दाखल होतानाचा भेद सहन करणार्‍या आळंदीकरांना यंदा मात्र पोलिस प्रशासनाने प्रेमाची भेट देऊ केली आहे. त्यांच्यासाठी खास गुलाबी रंगाचे वाहन प्रवेश पास उपलब्ध केले आहेत. यामुळे स्थानिकांनाच्या वाहनांनादेखील यंदा प्रवेश देता येणार आहे.

यंदा प्रथमच स्थानिकांची दखल घेण्यात आली असून, या निर्णयाचे आळंदीकरांकडून स्वागत करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत आळंदी पोलिस ठाण्याने यंदाच्या वारीत अधिकारी, कर्मचारी व विविध पोलिस पथके असे जवळपास अडीच हजार मनुष्यबळ वारीसाठी मागवले आहे. शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून नागरिकांनी तत्काळ पोलिस मदतीसाठी 112 नंबर डायल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत दि. 19, 20, 21 आणि 22 तारखांना आळंदी शहरात रस्त्यावर भाविकांची तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांनी तसेच भाविकांना आपली वाहने शनिवार(दि. 19)च्या आत वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावावीत, परत ती शक्यतो बाहेर काढू नयेत, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.

असा असेल पोलिस बंदोबस्त
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून 8 सहायक पोलिस आयुक्त, 50 पोलिस निरीक्षक, 193 पोलिस उपनिरीक्षक, 1250 पोलिस अंमलदार, 250 वाहतूक पोलिस अंमलदार आणि 650 होमगार्ड असा बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. यासह एसआरपीएफच्या 3 कंपन्या, एनडीआरएफच्या 2 तुकड्या, बीडीडीएसचे 2 पथके मदतीला पाचारण करण्यात आली आहेत.

कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने भाविकांच्या वाहनांकरिता पिवळ्या रंगाचा व स्थानिकांच्या वाहनांकरिता गुलाबी रंगाचा असे वेगवेगळे पास तयार करण्यात आले आहेत. ज्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पास हवा आहे, त्यांनी आळंदी पोलिस ठाण्यात अर्ज करून पास प्राप्त करून घ्यावेत.
                                                                       – सुनील गोडसे,
                                                                   वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आळंदी

Back to top button