कांद्याच्या भावात आणखी घसरण! शेतकरी हवालदिल | पुढारी

कांद्याच्या भावात आणखी घसरण! शेतकरी हवालदिल

चाकण; पुढारी वृत्तसेवा : मागील पंधरवड्यात 3 हजारांच्या पुढे गेलेल्या कांद्याचे दर पुन्हा खाली आले आहेत. कांद्याच्या दरात मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा असताना कांद्याचे सरासरी कमाल भाव 2 हजार 200 रुपयांच्या पुढे जाण्यास तयार नसल्याचे चित्र घाऊक बाजारात निर्माण झाले आहे. यंदा चाळींमध्ये साठवलेला कांदा हवामानामुळे खराब होऊ लागला असून, चाळींमधून बाजारात येत असलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याची शेतकर्‍यांची तक्रार आहे.

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी (दि. 12) कांद्याची आवक 7 हजार पिशवी होऊन कांद्याला 1500 ते 2200 रुपये प्रती क्विंटलला भाव मिळाला. कांद्याचा प्रतिकिलो उत्पादन खर्च किमान 22 ते 25 रुपयांच्या पुढे जात असताना दिवसेंदिवस कांद्याच्या भावात सातत्यपूर्ण घसरण होत आहे. यंदाच्या संपूर्ण कांदा हंगामात असेच चित्र राहिले.

परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मागील महिनाभरापासून वाढू लागली असताना प्रतिक्विंटलला किमान 1500 कमाल 2200 ते हजार रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च निघत नसल्याची शेतकर्‍यांची व्यथा आहे. गतवर्षीची कांद्याची उलाढाल पाहता यंदा कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच कांदा उत्पादकांच्या वाट्याला संघर्ष आला आहे. मागील सलग तीन महिन्यांपासून पाऊस, त्यातही परतीच्या पावसाने तांडव केले. त्यामुळे भविष्यात भाव मिळण्याच्या अपेक्षेने चाळींमध्ये साठविलेला कांदाही या हवामानाला बळी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी अवस्था
कांदा बाजारात विक्रीसाठी आणावा तर उत्पादन अन् वाहतूक खर्चदेखील निघत नाही अन् चाळीत साठवून भाव वाढण्याची वाट बघावी तर निसर्ग साथ देत नाही. त्यामुळे उत्पादकांची मफइकडे आड तिकडे विहीरफफ अशी अवस्था झाली आहे. पुढील काळात नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाने निर्यातीचे धोरण आखून कांदा उत्पादकांना आणखी तोट्यात जाण्यापासून सावरण्याची शेतकर्‍यांची मागणी आहे.

Back to top button