ठाकरे पदपथावरील झाडांची दुरवस्था; बिबवेवाडी परिसरातील चित्र | पुढारी

ठाकरे पदपथावरील झाडांची दुरवस्था; बिबवेवाडी परिसरातील चित्र

बिबवेवाडी; पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी परिसरातील केशव सीताराम ठाकरे पदपथावरील झाडांची दुरवस्था झाली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यावरील जवळपास सुमारे दहा शोभेची झाडे वाळलेली आहेत. तसेच काही झाडे रस्त्याच्या दुभाजकावर व बाजूला वाकलेली असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून या रस्त्यावरील काटेरी वनस्पती व इतर वृक्षांच्या फांद्या कटिंग केलेल्या आहेत. त्या तशाच दुभाजकावर पडून आहेत. काही ठिकाणी दुभाजकावरील या वृक्षाच्या मुळांमध्ये उंदीर व घुसांनी बिळे केल्याने त्यांची माती रस्त्यावर येत आहे. उद्यान विभागाचे कर्मचारी व संबंधित ठेकेदार याबाबत गंभीर नाहीत. त्यामुळे या झाडांची दुरवस्था झाली आहे. याबाबत वारंवार उद्यान विभागाला कळविण्यात आले असून, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष नांगरे यांनी सांगितले.

केशव सीताराम ठाकरे पदपथावरील वाळलेले वृक्ष तसेच कटिंग केलेल्या फांद्या संबंधित ठेकेदार व कर्मचार्‍यांना उचलण्यास सांगण्यात येईल. तसेच उद्यान पुन्हा नव्याने विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल.

                                 – अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक, महापालिका

 

Back to top button