पुणे : रेल्वेकडे पार्सलच्या डब्यांची कमतरता; पार्सलला पोहचायला होतोय उशीर | पुढारी

पुणे : रेल्वेकडे पार्सलच्या डब्यांची कमतरता; पार्सलला पोहचायला होतोय उशीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या पुणे विभागातून सोडण्यात येणार्या गाड्यांचे पार्सल डबे सध्या फुल्ल झाले असून, पुणे रेल्वे प्रशासनाला पार्सल डब्यांची कमतरता जाणवत आहे. परिणामी, पुण्यातून जाणारे पार्सल उशिरा जात आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. रेल्वेच्या पुणे विभागातून दिवसाला 200 ते 220 गाड्यांची ये-जा असते.

त्यामार्फत 70 ते 80 हजार प्रवासी नॉन-पिक सिझनमध्ये प्रवास करतात, तर पिक सीझनमध्ये प्रवाशांची संख्या एक ते दीड लाखांच्या घरात जाते. रेल्वेच्या प्रत्येक गाडीला दोन राखीव डबे हे पार्सल सेवेसाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्या डब्यांमधून विविध प्रकारची पार्सल देशभरात पाठवण्यात येतात. मात्र, सध्या पुण्यातून जाणार्या पार्सलची संख्या पाहता हे पार्सल डबे अपुरे पडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

पुण्याबाहेरून येणार्‍या गाड्या फुल्ल…
पुण्याबाहेरून येणार्‍या रेल्वे गाड्यांचे पार्सल डबेसुद्धा अगोदरच भरून जात आहेत. त्यामुळे रेल्वेच्या पुणे विभागाला बाहेरील गाड्यांच्या डब्यांमध्ये पार्सल ठेवण्यासाठी जागाच मिळत नाही. परिणामी, प्रवाशांची पार्सल पुणे रेल्वे स्थानकावरच पडून राहत आहेत. त्यामुळे अतिरिक्त डबे रेल्वे प्रशासनाला मिळावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

एप्रिल ते सप्टेंबर 2022 या सहा महिन्यांतील पार्सल वाहतूक…
1) हार्ड पार्सल (फर्निचर व कंपन्यांतील उत्पादन) :-
पाकिटे, वस्तू – 1 लाख 76 हजार 528 पार्सल
वजन – 7 हजार 459 टन
उत्पन्न – 3 कोटी 77 लाख 57 हजार
2) नाशवंत पार्सल (फळे, फळभाज्या, पालेभाज्या) :-
पाकिटे, वस्तू – 4 लाख 98 हजार 427
वजन – 1 हजार 118 टन
उत्पन्न – 4 कोटी 49 लाख रुपये
3) लगेज व इतर साहित्य :-
पाकिटे, वस्तू – 6 हजार 390 पाकिटे
वजन – 1 हजार 232 टन
उत्पन्न – 1 कोटी 5 लाख रुपये
4) दुचाकी :-
पुण्यातून पाठवलेल्या दुचाकी – 8 हजार 365
पुण्यात आलेल्या दुचाकी – 9 हजार 841

पुण्यातून जाणार्या रेल्वे गाड्यांमधील पार्सल डबे सध्या फुल्ल झाले आहेत. काही प्रमाणात पार्सल डब्यांची आम्हाला कमतरता भासत आहे. त्यासोबतच पुण्याबाहेरून येणार्या रेल्वे गाड्या फुल्ल भरून येतात. त्यामुळे त्या गाड्यांमध्ये आणि पुण्यातून जाणार्या गाड्यांमध्ये जागा मिळेपर्यंत पार्सल पाठविण्यासाठी आम्हाला वाट पहावी लागत आहे.
– मिलिंद हिरवे,
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक,
रेल्वे, पुणे विभाग

Back to top button