पुणे : सारसबाग चौपाटीचा सुधारित आराखडा; व्यावसायिकांची किरकोळ बदल करण्याची मागणी | पुढारी

पुणे : सारसबाग चौपाटीचा सुधारित आराखडा; व्यावसायिकांची किरकोळ बदल करण्याची मागणी

हिरा सरवदे

पुणे : सारसबाग चौपाटीचे रुपडे बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, चैपाटीचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याप्रमाणे चौपाटीचे नूतनीकरण करण्यास व्यावसायिकांनी सहमती दर्शविली आहे. मात्र, किरकोळ बदलाची मागणी केली आहे. ऐतिहासिक सारसरबाग पुण्यातील आणि पुण्याबाहेरील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.

येथील खाद्यपदार्थ चौपाटी बागेत येणार्‍या आबालवृद्धांसह अस्सल खवय्यांना कायमच खुणावते. त्यामुळे या परिसरात पार्किंग आणि अतिक्रमणांचा प्रश्न वारंवार उद्भवतो. दुसरीकडे व्यावसायिकांनी महापालिकेची परवानगी न घेताच दुकाने दुमजली केली आहेत. त्यामुळे येथील स्टॉलवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाकडून अनेकवेळा कारवाई केली जाते. या कारवाईत स्टॉलसमोरील शेड, टेबल, खुर्च्या, शेगड्या, गॅस आणि साहित्य जप्त केले जाते.

महापालिकेत आयुक्त विक्रम कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शहरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत सारसबाग चौपाटीवर कारवाई करून दहा ट्रक साहित्य जप्त केले होते. शिवाय, चौपाटी जवळपास महिनाभर बंद ठेवली होती. वारंवार होणारी अतिक्रमण कारवाई टाळण्यासाठी स्टॉलधारकांनी पुढाकार घेत तात्पुरता फूड प्लाझाचा आराखडा तयार केला होता.

तो महापालिकेला सादर केला. मात्र, या प्लाझाचा खर्च कोण करणार? या मुद्द्यावर प्रक्रिया थांबली होती. त्यानंतर महापालिकेने आता खर्चाची तयारी दाखवून चौपाटीच्या नूतनीकरणासाठी व फूड प्लाझा साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी एका संस्थेने तयार केलेल्या आराखड्यामध्ये महापालिकेने काही बदल सुचविले होते.

त्यानुसार संबंधित संस्थेने सुधारित आराखडा तयार करून महापालिकेला सुपुर्त केला आहे. या आराखड्यास व्यावसायिकांनी सहमती दर्शविली आहे. मात्र, आठ स्टॉलनंतर पाठीमागे जाण्यास जागा सोडल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दर चार स्टॉलनंतर पाठीमागे जाण्यास जागा सोडण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

असा आहे चौपाटीचा आराखडा

सणस मैदानाच्या बाजूस 8 बाय 8 फुटांचे 56 स्टॉल असतील.
स्टॉलच्या पाठीमागील बाजूस 5.5 फूट मोकळी जागा असेल.
दर 8 स्टॉलनंतर पाठीमागे जाण्यास 4 फूट जागा असेल.
स्टॉलसमोर टेबल-खुर्च्यांसाठी 18 फूट मोकळी जागा असेल.
पुढे 6 फूट अंतरावर शोभिवंत झाडे व कट्टे आणि वॉकिंग प्लाझा.

20 फूट रुंदीचा मुख्य रस्ता.
पुढे शोभिवंत झाडे व बसण्यासाठी कट्टे.
त्यानंतर सारसबागेच्या बाजूस 17 फूट रुंदीचा पादचारी मार्ग.
येथे येणार्‍यांच्या गाड्यांसाठी पेशवे पार्कमधील पार्किंग तीनमजली करण्याचे नियोजन.

Back to top button