पिंपरी : पीएमपीचे चालक बनताहेत वाहक; खासगीकरणामुळे प्रशासनाने काढला पर्याय | पुढारी

पिंपरी : पीएमपीचे चालक बनताहेत वाहक; खासगीकरणामुळे प्रशासनाने काढला पर्याय

राहुल हातोले

पिंपरी : प्रवाशांनो आपण ज्या पीएमपीने प्रवास करता त्या पीएमपीचा तुमच्या रोजच्या ओळखीतील चालक जर तिकीट काढताना वाहक बनलेला दिसला तर अचंबित होऊन जाऊ नका. कारण की आता खासगीकरणामुळे शहरातील आगारात पीएमपीच्या मालकी हक्काच्या गाड्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे खात्यातील कायमस्वरूपी असलेले आणि शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले चालक आता वाहक बनत आहेत.

शहरात आता पेट्रोल व डिझेलवर धावणार्‍या गाड्या बंद झाल्या असून, सर्वत्र सीएनजी आणि इलेक्ट्रिकवर चालणार्‍या खासगी मालकीच्या गाड्या धावत आहेत. या गाड्यांवरील चालक हे कंत्राटी तत्वावर काम करणारे कर्मचारी आहेत. तर, वाहक हे पीएमपीचे कायम स्वरूपी अथवा नेमणूक केलेले कर्मचारी आहेत. मात्र, पीएमपीकडे बसच शिल्लक राहिल्या नसल्याने चालक आता वाहक बनत आहेत.

आता चालकांनाच वाहकाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. त्यानुसार या चालकांना आता बॅचबिल्ला काढावा लागत आहे. खासगी बसवरील चालक हे कंत्राटी तत्वावरील कर्मचारी आहेत. मात्र, वाहकांवर तिकीट विक्रीमधून मिळणार्‍या उत्पन्नाची जबाबदारी असते. त्यामुळे वाहक हा खात्यातीलच असणे आवश्यक आहे. त्यामुळे खासगी बसवर चालक पदावर कर्मचारी नेमता येणे शक्य नसल्याने चालकांना वाहकांचे प्रशिक्षण दिले जात आहे.

निगडी आगाराचे शंभर टक्के खासगीकरण
शहरातील या आगारामध्ये पीएमपीच्या बसच शिल्लक राहिल्या नाहीत. त्यामुळे येथील कायमस्वरूपी चालक आता वाहक बनले आहेत.

बसची नोंद ठेवण्याचे दिले काम
खात्यातील 50 वर्षांवरील चालकांची इतर आगारांमधून सुटणार्‍या बसची नोंद ठेवणे आणि तपासणीस म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हता म्हणजेच दहावी पास असणार्‍या उमेदवारांना आरटीओ कार्यालयामधून बॅच बिल्ला काढण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे.

भक्ति-शक्ति आगार
(वाहक बनलेल्या चालकांची संख्या)
6
16
72 सीएनजी बस
60 इलेक्ट्रिक बस

खासगी बस वाढवून पीएमपीच्या बस आता बंद झाल्या आहेत. त्यामुळे पीएमपीचे कायमस्वरूपी चालकांना रोजगार मिळणे आवश्यक बनले आहे. त्यानुसार, त्यांना वाहकाचे प्रशिक्षण दिले जात आहे.
                                                                        – सुनील मोरे,
                                                               ड्युटी ऑफिसर, निगडी आगार

Back to top button