पिंपरी : चार रुग्णालयांत दरमहा 60 हजार रुग्णांवर उपचार, वायसीएम रुग्णालयावरील ताण होतोय कमी | पुढारी

पिंपरी : चार रुग्णालयांत दरमहा 60 हजार रुग्णांवर उपचार, वायसीएम रुग्णालयावरील ताण होतोय कमी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव, आकुर्डी, जिजामाता व भोसरी या चार रुग्णालयांना रूग्णांचा प्रतिसाद वाढत आहे. तेथे दर महिन्याला 60 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच, प्रसुतीच्या सुविधाही उपलब्ध असल्याने खासगी रुग्णालयामध्ये जाणार्‍या रुग्णांचीही पाऊले आता पालिकेच्या या घराजवळच्या रुग्णालयाकडे वळू लागली आहेत. परिणामी, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयावरील ताण हळूहळू कमी होत आहे.

वायसीएमवर येत होता ताण

एकूण 760 बेड क्षमतेच्या वायसीएम रूग्णालयात बारा महिने रूग्णांची मोठी गर्दी असते. त्यामुळे तेथील वैद्यकीय मनुष्यबळासह सेवा व सुविधेवर ताण येतो. या रूग्णालयावरील वाढता ताण कमी करण्यासाठी तसेच, शहरातील सर्व भागात पालिकेची चांगली उपचार सेवा उपलब्ध व्हावी म्हणून पालिकेने चार अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त रुग्णालयांची उभारणी केली. दोनशे बेडचे थेरगाव रुग्णालय, 130 बेडचे आकुर्डीतील प्रभाकर कुटे रुग्णालय, 120 बेडचे नवीन जिजामाता रुग्णालय आणि 100 बेडचे नवीन भोसरी रूग्णालये सुरू करण्यात आले. तेथे ओपोडी, आयपीडी, महिला प्रसुती कक्षासह, रक्त तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी, किरकोळ व मोठ्या शस्त्रक्रिया, विशेष व अतिविशेष बाह्यरूग्ण विभाग, अतिदक्षता विभाग आदी सेवा पुरविल्या जातात. तेथे 24 बाय 7 अशी सेवा दिल्या जात असल्याने तेथे उपचार घेण्यास रूग्ण पसंती देत आहेत.

सुविधा मिळत असल्याने रुग्णांचा ओढा वाढला

सोयी-सुविधा तसेच शहराच्या चार भागांमध्ये ही रुग्णालये असल्याने स्थानिक रुग्णांचा ओढा वाढला आहे. घरजवळ पालिकेचे चांगले रूग्णालय असल्याने नागरिक तेथे उपचार घेत आहेत. तसेच, पालिका कर्मचारी व वैद्यकीय अधिकार्‍यांकडून संवेदनशीलतने उपचार केले जात असल्याने खासगी रुग्णालयांकडे जाणारे रुग्णही पालिका रुग्णालयाकडे वळाले आहेत.

महापालिका रुग्णालयात उपचार घेण्यास दिली जातेय पसंती

पालिकेच्या थेरगाव, आकुर्डी, जिजामाता व भोसरी या चारही रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या भागांतील रुग्ण तेथे दाखल होत आहेत. दरमहिना सरासरी 60 हजार रुग्ण उपचार घेत आहेत, असे महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

दर महिन्यास 700 पेक्षा अधिक प्रसुती

चारही रुग्णालये जून 2021 मध्ये पूर्ण क्षमतेने सुरू झाली. सुरूवातीला या रुग्णालयामध्ये रुग्णांचे येण्याचे प्रमाण कमी होते. जून 2021 मध्ये चार रुग्णालये मिळून बाह्यरूग्ण सेवा विभागात (ओपीडी) 22 हजार 5 इतकी रूग्ण उपचार घेत होते. तर दाखल रूग्ण संख्या (आयपीडी) 508, सिजरीयन प्रसुती 34 व नॉर्मल प्रसुतीची संख्या 147 इतकी होती. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एक वर्षामध्ये चार रुग्णालयांमधील ओपीडीची संख्या 60 हजार इतकी झाली आहे. आयपीडी संख्या 3,500 इतकी आहे. दर महिन्याला चारशेहून अधिक नॉर्मल प्रसुती व सुमारे 300 सिजरीयन प्रसुती होत आहेत.

Back to top button