मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी : विरोधी पक्षनेते अजित पवार | पुढारी

मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी : विरोधी पक्षनेते अजित पवार

तळेगाव स्टेशन : मानवी अवयवांची तस्करी करणार्‍या व रुग्णांच्या जिवाशी खेळणार्‍यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्याची गरज आहे. अशा कडक तरतुदी केल्याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील कुकर्म्यांना आळा बसणार नाही, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
येथील तळेगाव जनरल हॉस्पिटल आणि कॉन्व्हलसंट होम यांचा संयुक्त उपक्रम म्हणून नव्यानेच सुरू झालेल्या कॅन्सर सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. या वेळी माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सुनील शेळके, वृषालीराजे दाभाडे सरकार, मायमर मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, संस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे व उपाध्यक्ष चंद्रभान खळदे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या वेळी अजित पवार म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निकोप आणि सजग असायला हवा. चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार, विहार, विचार, व्यायाम यांची सांगड घालून जगणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा सल्ला या वेळी पवारांनी दिला.

रुग्णसेवेकडे व्यवसाय म्हणून न बघता ते पवित्रकार्य म्हणून बघावे. पैसा कमविणे हा त्याचा उद्देश कधीच नसावा. तसेच, मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे हे भविष्यातील मोठे मेडिकल हब व्हावे.
                                                – अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

आबांच्या आठवणीने अजित पवार गहिवरले
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची आठवण सांगत अजित पवार यांनी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. आबांच्या आठवणीने पवार गहिवरले. कॅन्सर न होण्यासाठी तंबाखू, गुटखा यापासून दूर राहा असा सल्ला अजित पवार यांनी उपस्थितांना दिला. मी जेव्हा आबांना भेटायला गेलो, तेव्हा ते म्हणाले की, दादा, मी तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. आज ते आपल्यासोबत असते, अशा आठवणींना उजाळा देताना अजितदादांचा आवाज कातर झाला.

 

Back to top button