विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! दहावी-बारावी 17 नंबर अर्ज भरण्यास मुदतवाढ | पुढारी

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! दहावी-बारावी 17 नंबर अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला 17 नंबरचा अर्ज भरून बसणार्‍या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार 14 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना शाळांमार्फत अर्ज भरता येणार आहे. राज्य मंडळामार्फत घेण्यात येणार्‍या फेब्रु-मार्च 2023 च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला खासगीरित्या प्रविष्ट होणार्‍या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याचा कालावधी 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदतवाढीने निश्चित करण्यात आला होता.

आता अर्ज करण्यास मुदतवाढ मिळाली असून, माध्यमिक शाळांनी, कनिष्ठ महाविद्यालयांनी अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी रुपये 20 प्रतिदिन घेऊन विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत. अर्ज ऑफलाइन घेतला जाणार नाही. केवळ ऑनलाइन अर्जच स्वीकारले जाणार आहेत. 17 नंबरचा अर्ज ऑनलाइन स्वरुपात भरता येईल. माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मदत करण्याची सूचना मंडळाने दिली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना form17.mh-ssc.ac.in तर बारावीच्या विद्यार्थ्यांना form17.mh-hsc.ac.in या वेबसाइटवर अर्ज करता येईल. यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो आवश्यक आहे. संबंधित मुदतवाढ अंतीम असून यापुढे अर्ज भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button