बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागण्याचे प्रकार सुरूच आहेत. शुक्रवारी (दि. 11) दुपारी मगरवाडी येथे ट्रान्फॉर्मरमधून ठिणग्या उडाल्याने लागलेल्या आगीत चार शेतकर्यांचा 12 एकर ऊस जळून खाक झाला. याशिवाय उसासाठी केलेली ठिबक यंत्रणाही जळाली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान शेतकर्यांचे झाले आहे.
शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. शेतात असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून ठिणग्या पडल्या. त्यामुळे आग लागली. भरदुपारी लागलेल्या आगीमुळे उसाने लागलीच पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. बघता बघता 12 एकर ऊस आगीच्या भक्ष्यास्थानी पडला. शेतकर्यांनी आग नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, भरदुपारच्या उन्हामुळे आग अधिकच भडकत गेली.
या घटनेत सायली संग्राम सोरटे यांचा दोन एकर, अजित जालिंदर सोरटे व देवेंद्र संग्राम सोरटे यांचा प्रत्येकी चार एकर आणि रवींद्र पंढरीनाथ शेंडकर यांचा दोन एकर ऊस जळाला. येत्या चार महिन्यांनी हा ऊस कारखान्याला जाणार होता. या उसासाठी शेतकर्यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा पाण्यासाठी वापर केला होता. तीही जळाली. एकरी दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. जळीत उसाला साखर कारखान्याकडून टनाला 400 रुपये दर कमी दिला जातो. त्यामुळे शेतकर्यांना मोठी आर्थिक तोशीस सहन करावी लागते.
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे यापूर्वीही आमच्या क्षेत्रातील उसाला आग लागून मोठे नुकसान झाले आहे. यंदाही आमच्यावर ही परिस्थिती ओढवली. मागील जळीताचीच अद्याप भरपाई मिळालेली नाही. महावितरणने शेतकर्यांना तत्काळ नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे.
अजित सोरटे, शेतकरी
ट्रान्सफॉर्मरमधील फ्यूजमधून ठिणग्या पडल्याने ही आग लागली. यासंबंधी वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठविला जाईल.
किशोर कहार, शाखा अभियंता महावितरण