बारामतीत गनिमीकाव्याने होईल भाजपचा खासदार : केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचा विश्वास | पुढारी

बारामतीत गनिमीकाव्याने होईल भाजपचा खासदार : केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचा विश्वास

पौड; पुढारी वृत्तसेवा : ‘बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार करण्यासाठी प्रसंगी गनिमीकावा करू. या भागात सतत विजयी होणार्‍या उमेदवाराची योग्यता आहे की आपली कमतरता आहे, हे आपण पाहिले पाहिजे. बारामती लोकसभा मतदारसंघातून 2024 साली भाजपचा खासदार निवडून येईल,’ असा विश्वास जलशक्ती व अन्न सुरक्षा केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी दखणे (ता. मुळशी) येथे व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी लोकसभा प्रवास योजना मुळशी तालुका योजनेअंतर्गत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

त्या वेळी पटेल बोलत होते. या वेळी बारामती लोकसभा प्रभारी राम शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, माजी आमदार शरद ढमाले, बाबाराजे जाधवराव, जालिंदर कामठे, अविनाश मोटे, मुळशी तालुकाध्यक्ष विनायक ठोंबरे, महिलाध्यक्षा वैशाली सणस, अमोल धनवे, राजाभाऊ वाघ, श्याम धुमाळ तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुळशी सत्याग्रहाचे प्रणेते सेनापती बापट यांच्या माले येथे असलेल्या स्मारक येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी मुळशी तालुक्यात आल्यानंतर प्रथम पुष्पहार अर्पण केला.

विविध शाखांची उद्घाटने
शुक्रवारी बारामतीत केंद्रीय मंत्री पटेल यांचे शुक्रवारी (दि. 11) रोजी बारामतीत आगमन झाल्यावर त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. त्यानंतर त्यांनी तालुक्यातील करंजेपूल, सदोबाचीवाडी-होळ, वडगाव निंबाळकर व कोर्‍हाळे येथील भाजप शाखांची उद्घाटने केली.

बारामतीचा आगामी खासदार भाजपचाच
बारामती लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने लक्ष केंद्रित केले असून, त्यादृष्टीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. हा मतदारसंघ संवेदनशील म्हणून ओळखला जात असून, बारामतीचा आगामी खासदार भाजपचाच असेल, असा दावा केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी भिवरी (ता. पुरंदर) येथील नक्षत्र मंगल कार्यालयात शेतकरी व लाभार्थी मेळाव्यात केला.

सांगवी येथे मुक्काम
केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल हे बारामती तालुक्यातील सांगवी येथे मुक्कामी दाखल झाले. यावेळी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांच्या निवासस्थानी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल हे मुक्कामी आले आहेत. त्यांच्यासमवेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रभारी माजी मंत्री राम शिंदे, आ. राहुल कुल, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडेआदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button