रखडलेली कामे व पाणीपुरवठ्याच्या अडचणी सोडवा : आमदार सुनील शेळके

रखडलेली कामे व पाणीपुरवठ्याच्या अडचणी सोडवा :  आमदार सुनील शेळके

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा :  वडगाव शहरातील मुख्य रस्त्याच्या कामासह विविध विकासकामांचा आढावा घेऊन संबंधित कामे तात्काळ पूर्ण करावीत, पाणीपुरवठ्याबाबत असणार्‍या तांत्रिक अडचणी सोडवून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी सूचना आमदार सुनील शेळके यांनी दिली. वडगाव नगरपंचायत हद्दीतील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमदार शेळके यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, मुख्याधिकारी विजय सरनाईक, गटनेत्या प्रमिला बाफना, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, गणेश म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रवीण चव्हाण, शारदा ढोरे, पूनम जाधव, पूजा वहिले, सायली म्हाळसकर यांच्यासह नगरपंचायतचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

आमदार शेळके यांनी या वेळी शहरामधील विविध भागांत सद्यस्थितीत सुरू असलेली विकासकामे तसेच प्रलंबित असलेली विकासकामे व नगरपंचायत प्रशासकीय इमारत आदी कामकाजांचा आढावा घेतला. शहरातील विविध भागांत अनेक विकासकामे प्रगतिपथावर सुरू आहेत, तर काही कामे जागेच्या स्थानिक वादामुळे रखडली आहेत.

वादामुळे रखडलेली विकासकामे संबंधीत व्यक्तीशी चर्चा विनिमय करून ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी सुरू करावीत, अशी सूचना आमदार शेळके यांनी केली. पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचारी यांनी जागृत राहून पाण्याच्या पाईपलाईन संबंधित काही किरकोळ दुरुस्ती असतील, त्या त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

तसेच मुख्य रस्त्याचे कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व नगरपंचायत अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन मुख्य रस्त्याचे कामास दोन ते तीन दिवसांत सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आगामी काळातही कालावधीतही शहरातील विकासकामांसाठी अजून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन आमदार शेळके यांनी दिले.

गैरहजर नगरसेवकांवर केली नाराजी व्यक्त
दरम्यान, शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या आढावा बैठकीस भाजपचे 7 व राष्ट्रवादीचे 2 असे 9 नगरसेवक गैरहजर होते. शहरातील सुरू असलेल्या व रखडलेल्या विकासकामांची सद्यस्थिती या बैठकीत जाणून घेण्यात आली. अशा महत्त्वाच्या बैठकीला नगरसेवकांनी गैरहजर राहिल्याबद्दल आमदार शेळके यांनी तीव— नाराजी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news