पुणे : फळविक्रेत्याचा मुलगा निघालाय जर्मनीला | पुढारी

पुणे : फळविक्रेत्याचा मुलगा निघालाय जर्मनीला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : परिस्थितीमुळे त्यांना शिकता आलं नाही… पण, कष्ट करायचं अन् मुलांना शिकवायचं, हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं. कुटुंबाच्या जबाबदारीसाठी त्यांनी पुणं गाठलं अन् मंडईत हातगाडीवर चिकू विकण्याचा व्यवसाय सुरू केला… अपार कष्टातून त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं अन् मनात कोरलेलं मुलांना शिकवायचं स्वप्नही साकार केलं… आज त्यांच्या कष्टाचं चीज झालं असून, त्यांचा मुलगा परदेशात शिक्षणासाठी निघालाय… ही कहाणी आहे ज्ञानोबा बिरादार अन् त्यांचा मुलगा प्रमोद यांची.

प्रमोद हा आता इलेक्ट्रो मोबॅलिटीचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी जर्मनीला चालला असून, हे पाहून मुलाच्या परदेशी शिक्षणासाठी पै पै जमा करणार्‍या ज्ञानोबा यांचे आनंदाश्रू थांबत नाहीयेत. कात्रज येथे राहणार्‍या ज्ञानोबा यांनी 1984 साली व्यवसायानिमित्त कर्नाटकच्या बिदर येथून पुणे गाठले. पुण्यातील मंडईत त्यांनी हातगाडीवर चिकू विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

परिस्थितीमुळे ज्ञानोबा यांना फक्त दहावीपर्यंतचे शिक्षण घेता आले. एका हातगाडीवर चिकू विकण्याच्या व्यवसायापासून ते मार्केट यार्डातील स्वत:च्या गाळ्यापर्यंत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागली अन् बरेच हलाखीचे दिवस पाहावे लागले. पण, कष्ट करून त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. या प्रवासात त्यांची पत्नी अनिता यांनी त्यांना पूर्ण साथ आणि पाठिंबा दिला. त्यांची मुलगी अश्विनी हिचे लग्न झाले असून, त्यांचा छोटा मुलगा रोहन हा आयटी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे, तर प्रमोद हा जर्मनीत शिक्षण घेतल्यानंतर भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी इलेक्ट्रिक चिप्सची निर्मिती कशी होईल, यासाठी काम करणार आहे.

प्रमोद सांगतो, वडिलांचे कष्ट अन् आईची साथ, या दोघांच्या पाठिंब्यामुळे मी जर्मनीला चाललो आहे. हातगाडीवरील व्यवसायापासून ते मार्केट यार्डातील गाळ्यापर्यंतचा वडिलांचा प्रवास सोपा नव्हता. त्यात आईचेही कष्ट आहेत. वडील फक्त दहावी शिकलेले, आम्ही मुलांनी शिकावे, यासाठी त्यांनी अपार कष्ट केले अन् आज आम्ही शिकत आहोत, ही त्यांचीच पुण्याई आहे. मी सिंहगड कॉलेजमधून बीई मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून, पदव्युत्तर शिक्षणासाठी चाललो आहे.

इथपर्यंत पोहचण्यासाठी मोठा संघर्ष पाहिला, कष्ट करावे लागले, खूप हलाखीचे दिवस काढले. वडापाव खाऊन संपूर्ण दिवसही काढला. पण, जिद्द सोडली नाही. मेहनत केली आणि मार्केट यार्डमध्ये फळे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. या प्रवासात बाळासाहेब अमराळे, शीतल अमराळे यांच्यासह माझे भाऊ पंढरी आणि नामदेव यांनीही पूर्ण साथ दिली. त्याशिवाय पत्नीचा पाठिंबा तर मोलाचा आहे. मुलगा परदेशात चाललाय, याचा आनंद आहेच. कारण, त्यात त्याचीही मेहनत आहे. त्याने माझ्या कष्टाचे चीज केले.

                                      – ज्ञानोबा बिरादार

 

Back to top button