कात्रज मंडलाधिकार्‍याचा मनमानी कारभार | पुढारी

कात्रज मंडलाधिकार्‍याचा मनमानी कारभार

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा : कात्रज मंडलाधिकारी कार्यालयात मंडलाधिकारी नागरिकांना भेटत नाहीत. नागरिकांचे फोनही उचलत नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यांची वेगवेगळी कामे होण्यास सुमारे दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागत आहे. तरी मंडलाधिकारांच्या या कारभाराकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का?

असा प्रश्न नागरिक करीत आहेत. खेड शिवापूर भागातील अनेक गावांतील नागरिकांना महसूल विभागाशी निगडित कामासाठी कात्रज येथील मंडलाधिकारी कार्यालयात जावे लागते. मात्र, वेगवेगळ्या कामासाठी गेलेल्या नागरिकांना सोयीऐवजी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कारण मंडलाधिकारी कार्यालयात भेटतच नाहीत. साहेब कार्यालयात नाहीत, बाहेर गेलेत, तुम्ही पुन्हा या, अशी उत्तरे नागरिकांना कार्यालयात गेल्यावर मिळतात. साहेबांना फोन केला तर ते फोनच उचलत नसल्याने नागरिकांना अनेक दिवस वाट पाहावी लागते. याप्रकाराने नागरिक हैराण झाले आहेत.

अखेर त्रासून मग इतरांच्या माध्यमातून मंडलाधिकारी यांना फोन होतो. त्यानंतर अनेकदा ”सोयीस्करपणे” पाठपुरावा केल्यानंतर नागरिकांची कामे होतात, ही बाब समोर आली आहे. त्याचप्रमाणे अनेक ज्येष्ठ नागरिकांना मंडलाधिकारी कार्यालयात फेर्‍या माराव्या लागतात, ही दुर्दैवाची बाब आहे. या प्रकाराची वरिष्ठ अधिकार्‍यांनी दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, याबाबत हवेलीचे प्रांताधिकारी संजय असवले यांना विचारले असता ते म्हणाले, की मी मंडलाधिकारी यांच्याशी संपर्क
साधला आहे. त्यांना उद्या बोलावून घेतले असून, त्यांची चौकशी केली जाईल.

रावसाहेबांची बदली कधी?
मंडलाधिकारी यांचा कार्यकाळ हा सुमारे तीन वर्षांचा असतो; मात्र हवेली तालुक्यातील रावसाहेब तथा मंडलाधिकारी यांची गेली चार वर्षांपेक्षा जास्त काळ होऊनही बदली का होत नाही, याची चर्चा आहे. हवेली तालुक्याचा पदभार स्वीकारून जवळपास पाच वर्षे झाली; मात्र त्यांची बदली का केली जात नाही, हा प्रश्नच आहे.

Back to top button