दौंड तालुक्यातील 300 गुर्‍हाळघरे बंद | पुढारी

दौंड तालुक्यातील 300 गुर्‍हाळघरे बंद

पाटस; पुढारी वृत्तसेवा : उसाच्या किमतीत वाढ झाली असताना गुळाच्या किमती कमी झाल्या आहेत. परिणामी गुर्‍हाळ व्यावसायिक अडचणीत सापडल्याने दौंड तालुक्यातील सुमारे 300 गुर्‍हाळघरे बंद करण्यात आली आहेत. या सर्व प्रकाराने गुर्‍हाळचालक मेटाकुटीला आले आहेत. तालुक्यात सध्या गुर्‍हाळाला 2 हजार 600 रुपये उसाला बाजारभाव मिळत आहे, तर गुळाचा बाजारभाव कमी झाल्याने एका क्विंटलला म्हणजे 100 किलोला 3 हजार रुपये बाजारभाव झाला आहे. गुळाचा उत्पादन खर्च प्रति किलोला 8 रुपये होत असल्याने गुर्‍हाळचालक अडचणीत सापडल्याची माहिती गुर्‍हाळचालक प्रमोद भागवत यांनी दिली.

दौंड तालुक्यात सुमारे 1 हजार गुर्‍हाळांची संख्या असताना त्यातील अंदाजे 300 गुर्‍हाळ मालकांनी ती बंद केली आहेत, तर परप्रांतीय गुर्‍हाळचालक यामुळे पळून गेले असल्याने त्याचा तोटा येथील स्थानिक मालकांना सोसावा लागत आहेत. स्थानिक गूळ व्यापारी गुळाला म्हणावा असा बाजारभाव देत नसल्याने नेमका विश्वास परप्रांतीय व्यापार्‍यांवर ठेवावा की स्थानिक व्यापार्‍यांवर ठेवावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. पाटस परिसरातील 12 पैकी 6 गुर्‍हाळघरे याच कारणांनी गुर्‍हाळ मालकांनी बंद केली असल्याची माहिती गुर्‍हाळचालक प्रमोद भागवत यांनी दिली.

Back to top button