वडगाव पीरला बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जखमी | पुढारी

वडगाव पीरला बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जखमी

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : वडगाव पीर (ता. आंबेगाव) येथील पोखरकरमळा कमांक 2 येथील गोरख गणपत पोखरकर यांच्या शेळीवर बिबट्याने बुधवारी (दि. 10) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हल्ला करून जखमी केले. परिसरात बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील पोखरकरमळा क्रमांक 2 येथे पोखरकर हे आपल्या घराशेजारी शेतात काम करीत होते.

या वेळी घराजवळ असणाऱ्या गोठ्यात दोन शेळ्या होत्या व त्याच वेळी घराजवळील कुत्रे मोठ्यामोठ्याने भुंकायला लागले व काहीतरी गुरगुरण्याचा आवाज आला. पोखरकर गोठ्याकडे आले तर बिबट्याने शेळीवर हल्ला केला, त्यामुळे ’बिबट्या-बिबट्या’ असे जोराजोरात ओरडल्यामुळे बिबट्याने लागलीच धूम ठोकल्याने शेळी वाचली.

या घटनेची खबर मिळताच वनमजूर बाळासाहेब आदक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, या आठवड्यात दोन-तीन घटना घडल्या, तरीही एकही वन विभागाचा अधिकारी इकडे फिरकला देखील नाही. यावरून वन विभागाला बिबट्याचे किती गांभीर्य आहे, हे दिसून येते. वडगावपीर परिसरात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी सरपंच मीरा संजय पोखरकर, माजी सरपंच अण्णासाहेब पोखरकर, सोसायटीचे संचालक दिलीप पोखरकर व येथील शेतकरी ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button