पुणे : किराणा घराण्याचा प्रवास डिजिटल माध्यमावर | पुढारी

पुणे : किराणा घराण्याचा प्रवास डिजिटल माध्यमावर

सुवर्णा चव्हाण

पुणे : भारतीय शास्त्रीय संगीतातील महत्त्वाच्या घराण्यांपैकी एक असलेल्या किराणा घराण्यातील गायक-गायिकांनी संगीत क्षेत्रात मोठे योगदान दिले. स्वरमयी गुरुकुलतर्फे याच घराण्यावर आधारित किराणा घराणा ग्रंथालय व संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली असून, किराणा घराण्याचा प्रवास आता डिजिटल माध्यमावरही लवकरच उपलब्ध होणार आहे.

या केंद्रात असलेली किराणा घराण्यावरील पुस्तके, नियतकालिके, गायकांचे जुन्या रेकॉर्ड, व्हिडीओ तसेच छायाचित्रांचे डिजिटायझेशनचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होणार असून, हे सारे अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिले जाणार आहे. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या पुढाकारातून 13 सप्टेंबरला केंद्राचे उद्घाटन झाले.

किराणा घराण्याशी संबंधित असलेली पुस्तके, मासिके, नियतकालिकांचा खजिना केंद्रात संकलित केला आहेच. त्याशिवाय 20 जीबी डेटाही संकलित करण्यात आला आहे. आता याच खजिन्याचे डिजिटायझेशनचे काम सुरू झाले असून, लवकरच तो सोशल मीडियावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

याविषयी केंद्राचे समन्वयक प्रसाद भडसावळे म्हणाले, आताच्या घडीला अभ्यासकांना संगीतविषयक संशोधन करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांची हीच गरज ओळखून किराणा घराण्याचे एखादे स्वयंपूर्ण माहितीवजा संशोधन केंद्र असावे, असे डॉ. प्रभा अत्रे यांना वाटले.

त्यांची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी काम सुरू झाले आणि माहितीचे, साहित्य संकलनाचे कामही सुरू करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत किराणा घराण्यातील गायक, गायिका यांच्यासह लोकसहभागातून अनेक पुस्तके आणि डेटा संकलित करण्यात आला आणि केंद्राची सुरुवात करण्यात आली. आता या केंद्रात असलेल्या माहितीचा उपयोग अभ्यासकांना होत असून, सध्याच्या घडीला पुस्तकांच्या स्कॅनिंगचे काम सुरू आहे. त्याचे डिजिटायझेशन वर्षभरात होईल. रोज सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत केंद्र सुरू असते.

केंद्रात आहेत या गोष्टी…
किराणा घराण्याशी संबंधित 275 पुस्तके आणि सांगीतिक मैफली, गायन सभांचा 20 जीबी डेटा या केंद्रात उपलब्ध आहे. पुस्तकांमध्ये किराणा घराण्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींची चरित्रे आणि आठवणीवजा पुस्तके तसेच नोटेशनही आहेत. ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगळ, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, सवाई गंधर्व, डॉ. प्रभा अत्रे अशा विविध दिग्गजांवरील पुस्तकांचा त्यात समावेश आहे.

डॉ. प्रभा अत्रे यांनी लिहिलेल्या सांगीतिक पुस्तकांसह लेख आणि व्यक्तिचित्रांचाही त्यात समावेश आहे. संकलित केलेल्या डेटामध्ये गायकांच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ, छायाचित्रांचा समावेश आहे. घराण्याच्या इतिहासापासून ते आतापर्यंतच्या प्रवासापर्यंतची माहितीही पुस्तकांद्वारे उपलब्ध आहे. काही लोकांनी दिलेल्या त्यांच्याकडील जुन्या कॅसेट आणि जुने रेकॉर्डिंगही आहे.

Back to top button