वाढदिवसाचा बडेजाव शाहरुख खानच्या अंगलट, गुंडा विरोधी पथकाने केली उचलबांगडी | पुढारी

वाढदिवसाचा बडेजाव शाहरुख खानच्या अंगलट, गुंडा विरोधी पथकाने केली उचलबांगडी

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: वाढदिवसाला शहरातील गुन्हेगारांना एकत्रित करून दहशत पसरवणे, पिंपरी- चिंचवड येथील सराईत गुन्हेगार शाहरुख खान याच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलिसांनी त्याच्यासह चौघांची उचलबांगडी करून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. शाहरुख युनूस खान (२९, रा. काळाखडक, वाकड), सोन्या उर्फ आशिष विजय गोयर (२९, रा. थेरगाव), दीपक बाळू धोत्रे (२४, रा. निगडी) आणि कुलदीप श्रीनिवास बिराजदार (२४, रा. रहाटणी) अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान, सोमवारी (दि. ७) रात्री त्याने काळाखडक, वाकड येथील एका कार्यालयात वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाचे फोटो, रिल्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. दरम्यान, गुंडा विरोधी पथकाने याबाबत माहिती घेतली असता शाहरुख खान याला वाकड पोलिसांनी नोटीस देऊन कार्यक्रम घेण्यास मनाई केली होती. मात्र, तरी देखील त्याने वाकड पोलिसांच्या नाकावर टिच्चून जंगी कार्यक्रम घेतल्याचे समोर आले. या कार्यक्रमाला शहरातील गुन्हेगारांनी मोठ्या संख्यने हजेरी लावली होती. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.

या पार्श्वभूमीवर गुंडा स्कॉडने शाहरुख खानच्या वाढदिवसाला आलेल्या गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी (दि. १०) चौघांची उचलबांगडी करून त्यांच्यावर वाकड पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, इतरांचा शोध सुरु असल्याचे देशमुख यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

Back to top button