पारगाव : पाण्यावर दीर्घकाळ तरंगणारी जलपरी : वैष्णवी वाघ | पुढारी

पारगाव : पाण्यावर दीर्घकाळ तरंगणारी जलपरी : वैष्णवी वाघ

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : पाण्यात पोहताना, तरंगताना दमछाक ही होतेच. परंतु रांजणी (ता. आंबेगाव) येथील वैष्णवी सुधीर वाघ ही विद्यार्थिनी याला अपवाद ठरली आहे . वैष्णवी काही मिनिटे, काही तास नव्हे, तर कितीही वेळ पाण्यावर शरीराची कुठलीही हालचाल न करता तरंगते. वैष्णवीच्या तरंगण्याचा या परिसरात कुतूहलाचा विषय ठरला आहे.

रांजणी गावातील मीरावस्तीत सुधीर सोपान वाघ हे शेतकरी राहतात. वैष्णवी ही त्यांची मुलगी आहे. नारायणगाव (ता. जुन्नर) येथील गुरुवर्य रा. प. सबनीस महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिकते. कोरोनाच्या काळात शाळा-महाविद्यालय बंद असताना सुधीर वाघ यांनी वैष्णवीला घराशेजारी असलेल्या विहिरीत पोहायला शिकवले.

रोजच्या सरावाने वैष्णवी पोहण्यात तरबेज झाली. पोहताना दम लागल्यानंतर ती उलटी होऊन पाण्यावर तरंगू लागली. हाच सराव करत असताना ती पाण्यावर आपल्या शरीराची कुठलीही हालचाल न करता कितीही वेळ तरंगू लागली. काही मिनिटे तरंगली, त्यानंतर एक तास पाण्यावर ती तरंगली. सरावाने तिच्यात सुधारणा करून ती पाण्यावर कितीही वेळ तरंगत आहे.

वडिलांकडून मार्गदर्शन
माझे वडील सुधीर वाघ हे चांगले पोहणारे आहेत. मला कोरोनाच्या काळात त्यांनीच विहिरीत पोहायला शिकवले. पाण्यावर उलटे होऊन तरंगण्याच्या टिप्स दिल्या. मीदेखील नित्यनियमाने सराव केला. त्यानंतर हळूहळू मी पाण्यावर शरीराची कुठली हालचाल न करता तरंगण्याचा सराव केला. त्यात मला यश मिळाले. आता मी कितीही वेळ पाण्यावर हालचाल न करता, न दमता, न थकता तरंगू शकते, हा मला आत्मविश्वास आहे.

                                                             – वैष्णवी सुधीर वाघ

आम्हालाही कुतूहल
पाण्यावर तरंगताना हातापायांची हालचाल करावीच लागते, अन्यथा बुडण्याची शक्यता असते. परंतु, वैष्णवी पाण्यावर कितीही वेळ हालचाल तरंगू शकते . याबाबत आम्हाला देखील कुतूहल आहे. परंतु तिला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे.

                                                                    – सुधीर सोपान वाघ

Back to top button