

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील विहिरी, विंधनविहिरींना भरपूर पाणी आहे. तसेच धरणे, बंधारे तुडुंब आहेत. मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने या परिसरात कांदा लागवडीला वेग आला आहे. लोणी, धामणी, वडगावपीर परिसरात सध्या कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे मजूरटंचाईचा सामना करावा लागत आहे.
मजूरटंचाईवर उपाय म्हणून सावड पद्धतीचा अवलंब करूनही कांदा लागवड उरकत नसल्याने काही शेतकर्यांनी यांत्रिकीकरणाचा पयार्य निवडला आहे. धामणी (ता. आंबेगाव) येथील द्रौणागिरी मळ्यातील पांडुरंग जाधव, शांताराम जाधव, एकनाथ जाधव, बाळनाथ जाधव व नारायण नवले यांनी मजूरटंचाईवर मात करण्यासाठी ट्रॅक्टर यंत्राच्या साह्याने कांदा लागवड सुरू केली आहे.
यासंदर्भात महेंद्र जाधव, राजेंद्र जाधव, अक्षय जाधव, मोहन जाधव यांनी सांगितले की, अधिक मजुरी देऊन तसेच खाण्याची व राहण्याची सोय करून देखील मजूर मिळणे कठीण झाले आहे. यामुळे यांत्रिकी पद्धतीने कांदा लागवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पैशांची तसेच वेळेचीही बचत होते.