संग्रामदुर्गातील अतिक्रमण काढले; पुरातत्व व चाकण पालिकेची पोलिस बंदोबस्तात कारवाई | पुढारी

संग्रामदुर्गातील अतिक्रमण काढले; पुरातत्व व चाकण पालिकेची पोलिस बंदोबस्तात कारवाई

चाकण; पुढारी वृत्तसेवा : चाकण शहरातील ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ल्याच्या मशिदीच्या समोर बांधलेले पत्राशेड व शौचालय महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने चाकण नगरपरिषदेच्या मदतीने बुधवारी (दि. 9) काढून टाकले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान (चाकण, ता. खेड) यांनी संग्राम दुर्ग किल्ला या स्मारकातील पश्चिम बाजूकडील दक्षिण कोपर्‍यातील एका मशिदीच्या समोर बांधलेले शौचालय व पत्राशेड हे अनधिकृत असून ते काढण्याबाबतचे आदेश संबंधितांना द्यावे, अशी मागणी पुरातत्व भागाकडे केली होती. त्यानुसार पुरातत्व विभागाचे पुणे विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी चाकण नगरपरिषदेला पत्र देऊन सदरचे शौचालय व पत्राशेड काढण्याचे आदेश दिले होते.

पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत चाकण पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी सकाळी याठिकाणी कारवाई केली. चाकण पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला आहे. जेसीबी यंत्र व कर्मचार्‍यांच्या माध्यमातून संपूर्ण पत्राशेडलगतचे शौचालय काढण्यात आले. पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानने सदरचे अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. संबंधितांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांनी स्वतः हे अतिक्रमण काढून घेऊ, असे लेखी पत्राद्वारे कळवले होते. मात्र, त्यांनी अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे सहायक संचालक पुणे यांनी चाकण नगरपरिषदेला अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण निष्कासित करण्याच्या कारवाईवेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी, चाकण पालिकेचे अधिकारी, चाकण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी ठाण मांडून होता. याबाबत शाही मस्जिद किल्ला संस्थेचे विश्वस्त नसरुद्दिन इनामदार यांनी सांगितले की, प्रशासनाने कुठलीही पूर्व सूचना न देता सदरची कारवाई केली आहे. तर किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण झिंजुरके, राहुल वाडेकर यांनी, मागील चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने नियमानुसार अतिक्रमण काढण्याची कारवाई केल्याचे सांगितले.

Back to top button