बारामती-फलटण रस्त्यावरील खड्डे बुजणार का? केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दौरा | पुढारी

बारामती-फलटण रस्त्यावरील खड्डे बुजणार का? केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दौरा

अनिल तावरे

सांगवी : बारामती तालुक्यातील सांगवी परिसरात राजकीय नेत्यांचा राबता असायचा. त्या काळात विविध रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवून घेण्यात येत होते. गेल्या दहा वर्षांपासून सांगवी परिसरात एकही मान्यवर आला नसल्याने खड्डे बुजविण्याची परंपरा खंडित झाली आहे. आता शुक्रवारी (दि. 11) केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल हे सांगवी मुक्कामी येणार आहेत. बारामतीहून सांगवीला येताना या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. ज्या रस्त्याने पटेल येणार आहेत, त्या बारामती-फलटण रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजविण्यासाठी संबंधित प्रशासन दखल घेणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

बारामती-फलटण रस्त्यावर मोठमोठ्या पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार लहान-मोठे अपघात होऊन अनेक जण जायबंदी झाले आहेत. तर, काही वाहनचालकांच्या जिवावर बेतले आहे. मात्र, हा गंभीर प्रकार घडत असतानाही कोणीच या खड्ड्यांची दखल घेताना दिसत नाही. या रस्त्यावर बारामतीपासून सांगवीपर्यंत चार-पाच फूट रुंदीचे आणि सुमारे एक फूट खोलीचे ठिकठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांचे साम—ाज्य पसरले आहे. नवीन वाहनचालकांच्या जर खड्डा लक्षात आला नाही, तर खड्ड्यांमध्ये लहान-मोठी वाहने आदळून वारंवार अपघात घडत आहेत. या रस्त्याच्या खड्ड्यांची जबाबदारी कोणीच घेत नसून, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

ठेकेदारांनी दोन खड्डे बुजविले !
बारामती-फलटण रस्त्यावर शिरवली फाटा व सांगवी येथील मुख्य चौकालगत जीवघेणे खड्डे पडले होते. हे दोन्ही खड्डे बुजविण्यासाठी स्थानिक पत्रकारांनी आजूबाजूला चाललेल्या रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदारांना हे जीवघेणे खड्डे बुजविण्यासाठी विनंती केली होती. त्यास प्रतिसाद देऊन दोन ठिकाणचे खड्डे बुजविण्याचे काम केले.

Back to top button