पुणे : आता प्रेमकहाणीचे प्री-वेडिंग शूटिंग; सोशल मीडियावर तरुण जोडप्यांना मिळते दाद | पुढारी

पुणे : आता प्रेमकहाणीचे प्री-वेडिंग शूटिंग; सोशल मीडियावर तरुण जोडप्यांना मिळते दाद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अमित अन् अपूर्वा यांनी त्यांच्या प्रेमकहाणीवरील प्री-वेडिंग व्हिडिओ शूट करून घेतला अन् त्यांच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सध्या लग्नसराई सुरू झाली असून, तरुण जोडप्यांच्या प्री-वेडिंग शूटलाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता प्री-वेडिंग फोटोशूटसह स्वत:च्या प्रेमकहाणीवर आधारित खास व्हिडिओ शूट करून घेण्याकडे कल वाढला आहे. तरुण जोडप्यांकडून प्रेमकहाणीवरील या व्हिडिओंना मोठी मागणी असून, पहिल्या डेटपासून ते लग्नापर्यंतचा प्रवास त्यात मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. छायाचित्रकार, व्हिडिओग्राफरही ही प्रेमकहाणी हवी तशी शूट करून देत असून, प्रेमकहाणीवरील प्री-वेडिंग व्हिडिओंची क्रेझ वाढली आहे.

प्री-वेडिंग शूटची क्रेझ तशी नवीन नाही. गेल्या चार ते पाच वर्षांत प्री-वेडिंग फोटोशूटचे प्रमाण वाढले आहे. परंतु, यंदा प्रेमकहाणीवर आधारित प्री-वेडिंग व्हिडिओ तयार करून घेण्याकडे कल आहे. स्वत:च्या प्रेमकहाणीचा प्रवास इतरांनाही जाणून घेता यावा, आठवणींना उजाळा मिळावा, यासाठी खासकरून असे व्हिडिओ तयार करून घेतले जात आहेत. त्यासाठी छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर कामाला लागले असून, जिथे प्रेमकहाणी फुलली त्या ठिकाणापासून ते लग्नापर्यंतचा प्रवास…या व्हिडिओतून मांडला जात आहे.

या व्हिडिओंमधून आपली प्रेमकहाणी मांडण्याचा प्रयत्न होत आहेच, पण प्रेमाच्या नात्यातील एक हळवा कोपराही उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रेमकहाणीतील वास्तविक लोकेशन्सवर हे व्हिडिओ शूट केले जात आहेत. खास थीमनुसार पेहराव, मेकअप केला जात असून, प्रेमकहाणीवर आधारित एखाद्या चित्रपटाप्रमाणे लोकेशन, संगीत, अभिनय याप्रमाणे असे व्हिडिओ शूट होत असून, त्यानंतर ते व्हिडिओ एडिट करून, त्यात संगीताची भर घालून ते तयार केले जात आहेत. हेच व्हिडिओ जोडप्यांमार्फत सोशल मीडियावर अपलोड केले जात असून, त्याला पसंतीही मिळत आहे.

पुण़े फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय काप्रे म्हणाले, ’सध्या प्री-वेडिंग फोटोशूटसह सोशल मीडियावर आपली प्रेमकहाणी मांडता यावी, यासाठी प्रेमकहाणीवर आधारित व्हिडिओही शूट करून घेतले जात आहेत. आठ ते दहा मिनिटांच्या या व्हिडिओंमधून जोडप्यांची प्रेमकहाणी मांडण्याचा प्रयत्न होत असून, लग्न जुळलेल्या आणि लग्न झालेल्या जोडप्यांकडून अशा प्रकारच्या व्हिडिओंची मागणी आहे.’

प्रेमकहाणीवर असे व्हिडिओ शूट करण्यासाठी आधी प्रेमकहाणी आम्ही जाणून घेतो, त्यानुसार लोकेशन्स आणि थीम ठरवली जाते. मग, व्हिडिओ शूट केला जातो. व्हिडिओ शूट करण्यासाठी दोन दिवस लागतात. यासाठी 30 ते 40 हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो. प्री-वेडिंग फोटोशूटची क्रेझ आहेच. पण, व्हिडिओला तर सर्वाधिक मागणी आहे.

                                                           – रोहन पाडळे, छायाचित्रकार

Back to top button