पुणे : ग्रामपंचायतींच्या कामात बदल होणार? जिल्हा परिषदेकडून अभ्यासगटाची स्थापना

पुणे : ग्रामपंचायतींच्या कामात बदल होणार? जिल्हा परिषदेकडून अभ्यासगटाची स्थापना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या कामकाजात बदल होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेकडून एका अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. हा अभ्यासगट जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी काम करणार असून, सध्याची कामकाज पद्धती आणि या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी काय बदल अपेक्षित आहे, याचा अभ्यास करणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी नऊ सदस्यीय जिल्हास्तरीय अभ्यासगटाची स्थापना केली आहे. हा गट आपला अहवाल जिल्हा परिषदेला सादर करणार आहे. मांजरी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य राहुल काळभोर या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी असणार आहेत. त्याचबरोबर या अभ्यासगटात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिव्याख्याता, गट विकास अधिकारी, पंचायत विभागातील विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि कायदेतज्ज्ञांचा समावेश आहे. कायदा क्षेत्रातील दोन तज्ज्ञांना सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकार काळभोर यांना दिला आहे.

ग्रामपंचायत रेकॉर्डवरील 'आठ अ'च्या नोंदी या तीन विषयांबाबतचे आतापर्यंतचे सर्व अध्यादेश, गायरान जमीन वापर परवाना, सध्या ग्रामपंचायतींकडून दिले जाणारे ना-हरकत प्रमाणपत्र, सर्व कायदे, परिपत्रके आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करण्यात येणार आहे. अभ्यास झाल्यानंतर तीनही विषयावरील कामकाजात नेमकी काय सुधारणा करावी, याबाबत हा गट शिफारशी करू शकणार आहे.

जिल्हा परिषदेने केलेल्या या अभ्यासगटातील सदस्यांमध्ये ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील अधिव्याख्यात्या सोनाली घुले, जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरद माळी, बारामतीचे गटविकास अधिकारी अनिल बागल, मुळशी पंचायत समितीतील विस्तार अधिकारी (पंचायत) सुनील जाधव, हवेली पंचायत समितीतील ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार आदींचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news