शिरूर : डंपर चोरीची फिर्याद देणारा मालकच निघाला चोर

डोंबिवली
डोंबिवली

शिरूर; पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतून अज्ञात व्यक्तीने डंपर चोरी केल्याची फिर्याद बुधवारी (दि. 2) निळकंठ चंद्रकांत काळे (रा. तरडे, ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक मदतीच्या आधारे तपास केला असता फिर्यादी मालकानेच डंपर चोरी केल्याचे उघड झाले आहे.

बुधवारी (दि. 2) निळकंठ काळे यांनी रांजणगाव एमआयडीसी हद्दीतून त्यांच्या मालकीचा एमएच 12 आरएन 4137 हा डंपर चोरी गेल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक मदतीच्या आधाराने चोरीला गेलेल्या डंपरचा शोध घेतला असता त्या डंपरपाठोपाठ एक पांढर्‍या रंगाची आय ट्वेंटी कार वेळोवेळी दिसून आली.

पोलिसांनी डंपर चोरीला गेल्याच्या ठिकाणापासून ज्या मार्गाने डंपर गेला त्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता फिर्यादीच्या गावाकडेच हा डंपर गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी फिर्यादीस ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने इतर तीन मित्रांच्या मदतीने डंपरची चोरी केल्याची कबुली दिली.

फिर्यादी निळकंठ काळे (वय 29) कडून डंपर जप्त केला असून, त्याच्यासह नाना बाळू गाढवे (वय 23), मंदार रामचंद्र चौधरी (वय 20, तिघेही रा. तरडे, ता. हवेली), सुरज विजय पवार (वय 20, रा. तवरगल्ली, पाटस) यांना दि. 8 रोजी अटक केली. त्यांना बुधवारी (दि. 9) न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश गट्टे, शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे आदींनी केली. तपास दत्तात्रय शिंदे करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news