इंदापूर : कळाशीची जलजीवन मिशन योजना वादाच्या भोवर्‍यात | पुढारी

इंदापूर : कळाशीची जलजीवन मिशन योजना वादाच्या भोवर्‍यात

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : कळाशी (ता. इंदापूर) येथील जलजीवन मिशन योजनेचे काम निकृष्ट होत असल्याने व बक्षीसपत्र करून दिले जागेमध्ये विहीर न खोदता दुसर्‍याच जागेत खोदल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे. निकृष्ट कामाच्या तक्रारीचे दोनशे नागरिकांच्या सह्यांचे निवेदन गावातील नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पाणीपुरवठा योजनेसाठी बक्षीस पत्र करून दिलेले जागेमध्ये विहीर खोदलेली नाही. विहीर ओढ्यामध्ये खोदलेली असून, त्या ओढ्यामध्ये सतत सांडपाणी वाहत असते. त्यामुळे विहिरीतील पाणी दूषित असल्याने आरोग्यास हानीकारक आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी वापरलेली वाहिनीअतिशय निकृष्ट दर्जाची आहे.

त्याची चौकशी करावी, वाहिनी करीत असताना संपूर्ण गावातील व वाड्यावर त्यावरील जाणार्‍या रस्त्याच्या मधून चर खोदल्याने गावातील व वाड्यावस्त्यावरील रस्त्यांची खूप दुरवस्था झाली असून, त्याची दुरुस्ती पाणीपुरवठा योजनेचे काम घेतलेल्या मे. पद्मावती कन्स्ट्रक्शन यांचेकडून करून घ्यावी. निवेदनावर शंकर करे, राजेंद्र गोलांडे, तुकाराम गोलांडे, उद्धव रेडके, दादासाहेब भालेकर, पृथ्वीराज चव्हाण, अमोल देवकर आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

कोणीच दखल घेईना, आता उपोषण
याबाबतची लेखी तक्रार 27 सप्टेंबर रोजी इंदापूर पंचायत समितीकडे करूनही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. उपअभियंता व कनिष्ठ अभियंता पंचायत समिती यांनी प्रत्यक्षात पाहणी करूनसुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शंकर करे यांनी केला आहे. दोनशे ग्रामस्थांनी लेखी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे हे काम कोणाच्या वरदहस्ताने सुरूआहे, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. तक्रारीची दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अन्यथा 14 नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Back to top button