पुणे : घरफोडी करणारी ‘जिजा-साली’ गजाआड; ‘फॉर्च्युनर’ने रेकी | पुढारी

पुणे : घरफोडी करणारी ‘जिजा-साली’ गजाआड; ‘फॉर्च्युनर’ने रेकी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फॉर्च्युनरने रेकी करून घरफोडी करणार्‍या हायप्रोफाईल ‘जिजा-साली’ला अलंकार पोलिसांनी अटक केली. लक्ष्मीपूजनासाठी बाहेर काढलेल्या आर्किटेक्चरच्या घरातील हिरे, सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारत दोघांनी पळ काढला. त्यांच्याकडून चोरी केलेल्या ऐवजासह तब्बल 1 कोटी 13 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे उच्चशिक्षित आणि गर्भश्रीमंत असून, नाशिक, वाकड, शिर्डीसह राज्यातील काही शहरांत त्यांच्या अनेक प्रॉपर्ट्या, फार्म हाऊस असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजू दूर्योधन काळमेध (45, रा. वडगाव बुद्रुक), सोनिया श्रीराम पाटील (32, रा. वडगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघे नात्याने दाजी-मेव्हणी आहेत. 27 ऑक्टोबर रोजी कर्वेनगरमधील नटराज सोसायटी परिसरात असलेल्या एका बंगल्यामध्ये ही घटना घडली होती. याबाबत आर्किटेक्टर व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आर्किटेक्ट आहेत. त्यांचा नटराज सोसायटी भागात बंगला असून, लक्ष्मीपूजनासाठी त्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने बाहेर काढले होते. 25 तारखेला पूजा झाल्यानंतर ते बाणेर येथे त्यांच्या मुलाकडे गेले होते. तर, 27 तारखेला ते परत आल्यानंतर त्यांना घरातील दागिने चोरी गेल्याचे समजले. त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

दाखल गुन्ह्यातील माहितीनुसार अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. कर्वेनगर भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयित आरोपीचा माग काढला. या दरम्यान संशयित आरोपी हा सिंहगड रस्ता भागात असल्याची माहिती पोलिस नाईक सागर केकाण, धीरज पवार, नितीन राऊत यांना मिळाली.

पथकाने सापळा रचून काळमेध याला ताब्यात घेतले. तर, मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सोनिया हिला वाकड पुलाखालून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूर्यकांत सपताळे, अरविंद शिंदे, महेश निंबाळकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

…हॉटेल व्यवसाय ते कोट्यवधीची प्रॉपर्टी
आरोपी काळमेध हा हॉटेल व्यावसायिक असून, सोनिया ही त्याची मेव्हणी आहे. काळमेध हा आठवी पास आहे. तर, सोनिया ही उच्चशिक्षित आहे. तिने बीए.एल.एल.बीचे शिक्षण घेतले आहे. आरोपींचा पुण्यातील वडगाव, वाकड, शिर्डी येथे स्वतःच्या मालकीचे प्लॅट असून, नाशिक येथे फार्म हाऊस आहे. दोघांनी संगनमताने रेकी करून घरफोडीचा गुन्हा केला आहे. आरोपीच्या अलिशान गाडीत 9 स्क्रू ड्रायव्हर मिळाले असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. काळमेध हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर राज्यासह परराज्यांतही विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

दिवसा रेकी अन् रात्री डल्ला
काळमेध आणि त्याची मेव्हणी हे दिवसा रेकी करून रात्री चोरी करीत होते. चोरी करताना हाय-प्रोफाईल परिसरातील बंगल्याची निवड करत. तेथे कोणी नसल्याचे पाहून रात्रीच्या वेळी दुचाकीवर येऊन डल्ला मारत होते. मात्र, कोणाला आपला संशय येऊ नये, म्हणून दिवसा रेकी करण्यासाठी फॉर्च्युनअरसारख्या महागड्या गाडीचा वापर करत होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी तब्बल सात दिवसरात्र परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी केली.

Back to top button